मराठी छोट्या पडद्यावर सध्या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यापैकी एक आहे. 'पाठराखीण' मालिका. स्टार प्रवाहकडून नुकतीच या मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ५ वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार आहे, तर अनेक गाजलेल्या सिनेमात झळकलेली अभिनेत्री गौरी इंगवले या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवतेय.
त्यामुळं दोघींसाठीही मालिका खास आहे. या मालिकेचा प्रोमोही नुकताच समोर आलाय.
'पाठराखीण' मालिकेचा प्रोमो व्हायरल
प्रोमो समोर आल्यानंतर 'पाठराखीण' यामालिकेची चर्चा सुरू आहे.प्रोमो पहिल्यानंतर लक्षात येतं की, ही गोष्ट आहे प्रत्येक संकटात आणि प्रत्येक वेदनेत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं रहाणाऱ्या भाग्यश्री आणि प्राजक्ता या दोन बहिणींची आहे.बहिणींच्या नात्यातील निस्सीम प्रेम, त्याग आणि जिव्हाळा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.लग्नासाठी भाग्यश्रीचा कांदेपोहेचा कार्यक्रम सरू असतो. ती पोह्यांचा ट्रे घेऊन पाहुण्यांसमोर जाते, पण चमचे स्वयंपाकघरातच विसरते. त्यामुळे प्राजक्ता चमचे द्यायला जाते. पाहुणे भाग्यश्री ऐवजी प्राजक्तालाच पसंत करतात..यामुळं भाग्यश्रीच्या आईचा संताप होतो. .असा हा प्रोमो आहे.
सुख-दुःखात नेहमी सोबत असणाऱ्या या बहिणींचं आयुष्य मात्र एका अनपेक्षित वळणावर बदलतं. परिस्थिती, समाज आणि नियती यांच्या कसोटीवर त्यांचं नातं कसं टिकून रहातं, याची मांडणी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.
मालिकेच्या कमबॅकबद्दल प्राजक्ता म्हणाली की, पाच वर्षांनी छोट्या पडद्यावर पुन्हा प्रेक्षकांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. खूप दिवसांपासून मालिका कधी करणार यासाठी विचारणा होत होती. या मालिकेच्या निमित्ताने ही सुवर्णसंधी चालून आली. स्टार प्रवाह सारखी लोकप्रिय वाहिनी आणि बांदेकर कुटुंबियांची सोहम प्रोडक्शन सारखी निर्मिती संस्था असताना नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं, असंही तिनं म्हटलं.
तसंच मध्यंतरीच्या काळात बरेच मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपट केले. अनेक जाहिराती केल्या. टीव्ही हे माझं अत्यंत आवडतं माध्यम आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही वेगळी भूमिका आहे. प्राजक्ता कुलकर्णी असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. लहान वयातच आई-वडिलांचं छत्र गमावलेल्या प्राजक्ताचा सांभाळ तिचे मामा चंद्रशेखर वैद्य यांनी केलाय. तिच्यासाठी मामा-मामी म्हणजे जणू विठ्ठल-रखुमाई. त्यांचा प्रत्येक शब्द तिच्यासाठी अंतिम आहे. वैद्य कुटुंबावर तिचं अपार प्रेम आहे आणि या घराचं भलं व्हावं यासाठी ती काहीही करु शकते. प्रेक्षकांनी या भूमिकेलाही प्रेम द्यावं ही अपेक्षा आहे असं प्राजक्ता म्हणाली.
अभिनेत्री गौरी इंगवले देखिल मालिका विश्वात एण्ट्री घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. खूप दिवसांपासून मालिका करण्याची इच्छा होती. पाठराखीण मालिकेमुळे माझी इछापूर्ती होतेय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असं ती म्हणाली.
नेटकऱ्यांना आठवली हिंदी मालिका
तर अनेक नेटकऱ्यांना ही मालिका पाहून जुनी हिंदी मालिका आठवली. गाजलेल्या बिदाई या हिंदी मालिकेतही असंच काहीसं कथानक पाहायला मिळालं होतं.

