मुंबई : राज्यासह देशात सूर्य आग ओकतोय. तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे घराघरात पंखे, कुलर, एसीचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यामुळे विजेचा मोठा वापर होत आहे.
परिणामी विजेचं बिल जास्त येत आहे. यामुळे नागरित चिंतेत आहेत. पण विजेच्या बिलापासून दिलासा हवा असेल तर केंद्र सरकारची एक खूप चांगली योजना आहे. या योजनेचं नाव पीएम सूर्यघर मोफत वीज योजना असं आहे. या योजनेतून नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 300 यूनिटपर्यंत फ्री वीज मिळत आहे. या योजनेसाठी नागरिकांना सब्सिडीदेखील मिळते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हावा यासाठी हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या योजनेचा उद्देश हा एक कोटी घरांपर्यंत रुफटॉप सोलर पोहोचावणे, वीज बिल कमी करणं आणि देशांतर्गत हरित ऊर्जा उत्पादन वाढवणं असा आहे.
विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार नागररिकांना आपल्या घरांच्या छतावर सोनार पॅनल बसवण्यासाठी आर्थिक सहाय्य देखील करतं. या सोलार पॅनलच्या माध्यमातून नागरिक आपल्या घरासाठी लागणारी वीज स्वत: तयार करु शकणार आहेत. तसेच अतिरिक्त वीज ग्रिडला पाठवून आर्थिक लाभ देखील मिळवू शकतात.
या योजनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबांचा वीजेचा खर्च हा शुन्यावर येईल, असा केंद्र सरकारचा दावा आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी नागरिक मार्च 2027 पर्यंत अर्ज दाखल करु शकतात. त्यामुळे ज्या नागरिकांना विजेचं बिल जास्त द्यावं लागतं, ते कुटुंब या योजनेसाठी अर्ज दाखल करु शकतात. ही योजना दिर्घकाळासाठी फायदेशीर आहे.
पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून सोलार सिस्टीम लावण्यासाठी सरकार सब्सिडी देतं. सोलार प्लांट बनवण्यासाठी 80 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. यासाठी सरकारकडून कर्जाच्या माध्यमातून देखील पर्याय उपलब्ध आहेत. माहितीनुसार, 7 टक्के व्याजदराने 2 लाख रुपयांचे कर्ज या कामासाठी नागरिकांना मिळू शकते. विशेष म्हणजे केंद्र सरकार या खर्चाच्या 40 ते 60 टक्के पैसे सब्सिडीच्या रुपाने परत देतं.
नेमकी किती सब्सिडी मिळते?
केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या kW च्या सिस्टीमवर वेगवेगळ्या प्रकारची सब्सिडी दिली जाते. 1kW च्या सिस्टीमवर सरकारकडून 30 हजार रुपयांची सब्सिडी दिली जाते. 2kW च्या सिस्टीमवर सरकारकडून 60 हजार रुपयांची सब्सिडी दिली जाते. तर 3kW च्या सिस्टीमवर सरकारकडून 78 हजार रुपयांपर्यंत सब्सिडी दिली जाते. असं असलं तरी काही राज्यांमध्ये त्या त्या राज्य सरकारकडून अतिरिक्त सब्सिडी दिली जात असल्याची देखील माहिती आहे.कसा मिळणार लाभ आणि अर्ज कसा करायचा?
ज्या नागरिकांचं स्वत:चे पक्क घर आहे, स्लॅबचे पक्के छत आहे आणि त्या व्यक्तीच्या नावावर विजेचं कनेक्शन आहे, अशा व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर सर्वात आधी www.pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. इथे गेल्यानंतर आपल्या राज्याची विज कंपनी जसे की, MSEDCL असे टाका, आपले नाव आणि कंज्यूमर नंबर टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरने लॉगिन करा आणि 'रुटटॉप सोलर'साठी ऑनलाइन अर्ज करा. वीज कंपनीकडून मंजुरी मिळाल्यानंतर पोर्टलवर उपलब्ध वेंडरला निवडा आणि आपल्या घराच्या छतावर पॅनल लावून घ्या. इन्स्टॉलेशन नंतर वेंडरकडून मिळालेल्या माहिती आणि प्लांटचा फोटो पोर्टलवर अपलोड करा आणि 'नेट मीटर'साठी अर्ज करा. डिस्कॉमचे अधिकारी प्लांटचे फिजिकल वेरीफिकेशन करतील. या प्रक्रियेनंतर 30 दिवसांत सस्बिडीची पूर्ण रक्कम बँक खात्यात जमा होते.

