Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'पोलिसाच्या खिशात २० रुपये सुद्धा नाही', काकडी फुकट खाल्ली आणि पैसे मागताच विक्रेत्याला मारलं, व्हिडीओ व्हायरल

'पोलिसाच्या खिशात २० रुपये सुद्धा नाही', काकडी फुकट खाल्ली आणि पैसे मागताच विक्रेत्याला मारलं, व्हिडीओ व्हायरल

Viral Social Media Clip: एका विक्रेत्यानं पोलिसावर काकडी खाऊन पैसे न दिल्याचा आरोप केला आहे. हा आरोप सिद्ध करण्यासाठी त्यानं पोलिसाचा व्हिडीओ देखील काढलाय. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून नेटकरी त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत.

पोलिसांचं काम परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखणं आहे. जर कोणी कायद्याचं उल्लंघन करत असेल, तर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करणं आणि कायद्याच्या चौकटीत राहून लोकांची मदत करणं हे त्यांचं काम आहे. पण काही वेळेस पोलीस मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करतात आणि सामान्य जनतेचीच पिळवणूक करतात. याचंच उदाहरण देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक विक्रेता पोलिसांवर मारहाणीचा आरोप करत आहे. तो म्हणतोय, पोलिसानं २० रुपयांची काकडी खाल्ली, पण पैसे मागितल्यावर त्याला मारहाण केली. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून नेटकरी या पोलिसावर टीका करत आहेत.नेमकं घडलं काय?​



हा व्हिडीओ @AnilYadavmedia1 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या कडेला काकडी विकणारा एक विक्रेता पोलीस कर्मचाऱ्यासोबत २० रुपयांसाठी वाद घालत आहे. त्यानं आरोप केला आहे की, पोलीस कर्मचाऱ्यानं त्याच्याकडून काकडी घेतली आणि खाल्ली, पण पैसे दिले नाहीत. उलट पैसे मागितल्यावर त्याला मारहाण केली. अर्थात, पोलीस कर्मचाऱ्यानं हे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, विक्रेता मोठ्या आत्मविश्वासानं पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप करताना दिसतोय.
काय म्हणतोय विक्रेता?​



विक्रेता व्हिडीओमध्ये म्हणतोय, 'गेल्या १० मिनिटांपासून हे पोलीस कर्मचारी माझ्याशी वाद घालत आहेत. तुम्ही काकडी खाल्ली, त्याचे पैसे द्यावेच लागतील. तुम्ही मला मारलं आहे. हे सगळं मी व्हिडीओमध्ये रेकॉर्ड केलं आहे.' हा व्हिडीओ ९१ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. कोणी म्हणतंय, पोलीस अधिकारांचा गैरवापर करत आहेत, तर कोणी प्रश्न विचारतंय, या पोलिसाकडे २० रुपये सुद्धा नाहीत का?
पोलिसावर कारवाई होऊ शकते का?​



ही घटना नेमकी कुठे घडली, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांचा गणवेश आणि बोली ऐकून ही घटना पंजाबमध्ये घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असो, पण जर विक्रेत्यानं या प्रकरणी तक्रार केली आणि आरोप सिद्ध झाले, तर पोलीस कर्मचारी निलंबित होऊ शकतो. त्याच्यावर विभागीय आणि कायदेशीर कारवाईदेखील होऊ शकते. मात्र, ही कारवाई केवळ व्हिडीओच्या आधारावर होणार नाही. कारण व्हिडीओ हा घटना घडल्यानंतरचा आहे. त्यामुळे अधिकृत चौकशी, पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारेच अंतिम निर्णय घेतला जाईल.

(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims