Dailyhunt
Prajakta Mali : 'लग्नाचं प्रेशर कसं हाताळतेस?' प्राजक्ता माळीला चाहत्याचा प्रश्न; अभिनेत्री म्हणाली, 'जे होतं ते चांगल्यासाठी...'

Prajakta Mali : 'लग्नाचं प्रेशर कसं हाताळतेस?' प्राजक्ता माळीला चाहत्याचा प्रश्न; अभिनेत्री म्हणाली, 'जे होतं ते चांगल्यासाठी...'

मुंबई - प्राजक्ता माळी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून ती मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्याचबरोबर प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही करते.

अभिनेत्री सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते आणि चाहत्यांना तिच्याविषयीचे अपडेट्स देते. अनेकदा प्राजक्ता माळी इन्स्टाग्रामवर 'आस्क मी' सेशन घेते आणि चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देते. अशातच आता नुकत्याच एका 'आस्क मी' सेशनदरम्यान प्राजक्ता माळीनं लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

प्राजक्ता माळीचं चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर

इन्स्टाग्रामवर 'आस्क मी' सेशनदरम्यान चाहते प्राजक्ताला तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल प्रश्न विचारतात. अभिनेत्री कधी लग्नबंधनात अडकतेय याकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. प्राजक्ता माळीचं वय आता ३६ असून अभिनेत्री अद्याप सिंगल आहे. प्राजक्तानं नुकत्याच घेतलेल्या 'आस्क मी' सेशनदरम्यान एका चाहत्यानं अभिनेत्रीला, 'लग्न करण्यासाठीचा दबाव, प्रेशर कसं काय मॅनेज करतेस? कधी मागे पडल्यासारखं वाटतं का? किंवा या सगळ्याचं कधी दडपण येतं का?' असा प्रश्न विचारला. त्यावर प्राजक्ता माळी म्हणाली की, 'मला असं वाटतं, योग्यवेळी योग्य गोष्टी घडतील...आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. जे तुमचं आहे, ते कधी ना कधी तुमच्याजवळ येणारच आहे.'

घरच्यांना समजावणं अवघड

'आता घरच्यांना ही Philosophy समजावणं अवघड आहे, ते मलाही जमत नाही' असंही प्राजक्तानं पुढे म्हटलं आहे.


काही दिवसांपूर्वी घेतलेल्या 'आस्क मी' सेशनमध्ये एका चाहत्याने प्राजक्ताला 'राष्ट्रीय प्रश्न...तू लग्न कधी करणार?' असं विचारलं. त्यावर प्राजक्तानंही सडेतोड उत्तर दिलेलं. अभिनेत्री म्हणाली, 'हा माझ्या आई-वडिलांचा प्रश्न आहे, तुमचा नाही'


दरम्यान, प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल सांगायचं तर तिला 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेनं ओळख मिळाली. अभिनेत्रीनं काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. तसंच प्राजक्ता माळीनं निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं असून तिचा 'फुलवंती' हा सिनेमा प्रदर्शित झालेला. या सिनेमात प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत होती. आता अभिनेत्री कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय, याकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims