म. टा. प्रतिनिधी, पुणे : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी दिवसभर जिल्हा, पिंपरी-चिंचवडमधील विविध बस आगारांना आणि स्थानकांना भेटी देऊन पाहणी केली. या वेळी स्वच्छतागृहांची दुरवस्था, स्वच्छतेचा अभाव समोर आला असून, त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
ज्या ठिकाणी कामात दिरंगाई दिसेल, अशा ठिकाणी अधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली.
लोणावळा येथील नियंत्रण कक्ष, उपाहारगृह, स्वच्छतागृह व प्रवासी बैठक कक्षाची पाहणी करून वस्तूस्थिती जाणून घेतली. लोणावळा बस स्थानकावर दैनंदिनी ये-जा करणाऱ्या सुमारे तीनशे बस येत असल्याचे सांगितले जात असले, तरी या ठिकाणी प्रत्यक्षात एवढ्या प्रमाणात बस येत नसल्याच्या तक्रारींचा पाढा अनेक बस या ठिकाणी ये-जा केल्याची नोंद करून महामार्गावरील अनधिकृत बस स्थानकावर जातात, अशी तक्रार करण्यात आली. यावर सरनाईक यांनी याबाबत त्वरित निर्णय घेण्याचे आदेश दिले.
...अन् पैसे मिळाले परत
एसटी बस स्थानकावरील विविध स्टॉलची पहाणी करताना एका स्टॉलधारकाने महिला प्रवाशांकडून पाण्याच्या बाटलीचे अव्वाच्या सव्वा पैसे घेतल्याचे मंत्री सरनाईक यांच्या लक्षात आले. यावर त्यांनी संबंधित महिला प्रवाशाला 'तुम्ही पाण्याच्या बाटलीचे किती पैसे दिलेत' अशी विचारणा करून माहिती घेतली आणि संबंधित स्टॉलधारकाला धारेवर धरून अतिरिक्त पैसे संबंधित महिला प्रवाशाला देण्यात सांगितले.'मराठी आलीच पाहिजे'
चिंचवड : 'महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी चालवायची असले, तर मराठी भाषा आलीच पाहिजे,' असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड बस आगाराच्या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वल्लभनगर येथील आगाराची पाहणी केल्यानंतर त्यांनी स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेवर नाराजी व्यक्त केली.'एकदाच संधी देतो'
इंदापूर येथील बसस्थानकातील अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा आणि वाढते अतिक्रमण या गंभीर प्रश्नांवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट बोट ठेवून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. कोणतीही पूर्वसूचना नसताना सरनाईक थेट बसस्थानकात उतरले आणि स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, प्रवाशांच्या बसण्याच्या जागा, चालक-वाहकांचे केबिन आदी सर्व सुविधांची पाहणी केली. पाहणीदरम्यान आढळलेल्या अस्वच्छतेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'एकदा संधी देतो. सुधारणा झाली नाही, तर माझ्या पद्धतीने कारवाई करीन,' असा इशारा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

