म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्र सदन घोट्याळ्यात आरोप झालेले आणि नंतर दोषमुक्त झालेले कृष्णा चमणकर (७१) यांना कार अपघात प्रकरणी अटक करण्यात आली आहे. चमणकर यांनी मालाड येथे रविवारी रात्री बेदरकारपणे कार चालवत एक दुचाकी आणि काही रिक्षांना धडक दिली.
त्यात दुचाकीवरील प्रियांका सत्रा (३४) या वकील महिलेचा मृत्यू झाला, तर तिचे पती मयांक सत्रा आणि रिक्षांतील पाच प्रवासी जखमी झाले आहेत. या प्रकरणी चमणकर यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
व्हिलचेअरवरुन पती अंत्यदर्शनाला
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जखमी अवस्थेतील मयंक सत्रा यांना रुग्णालयातून व्हीलचेअरवरून घरी आणण्यात आले, जेणेकरुन अंत्यसंस्कारापूर्वी ते पत्नी प्रियांका हिचे अखेरचे दर्शन घेऊ शकतील. 'इमिटेशन ज्वेलरी'चा व्यवसाय करणारे मयांक अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. प्रियांका यांच्या पश्चात पतीसह आठ वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.सोमवारी जेव्हा प्रियांका यांची अंत्ययात्रा मालाड स्मशानभूमीकडे निघाली, तेव्हा वातावरण अत्यंत शोकाकुल झाले होते. जखमी अवस्थेत व्हीलचेअरवरुन आपल्या पत्नीचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्या मयांक यांना पाहून उपस्थित असलेल्या सर्वांचे हृदय हेलावले. नातेवाईक व मित्र मंडळींना आपले अश्रू आवरणे कठीण झाले.
कसा झाला अपघात?
मालाडच्या मामलेदारवाडी जंक्शन येथून रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास कृष्णा चमणकर हे एमजी विन्सर ही कार घेऊन जात असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. कार इतकी वेगात होती की, येथून जाणाऱ्या सत्रा दाम्पत्याच्या दुचाकीला त्यांनी धडक दिली. त्यात सत्रा दाम्पत्य दूरवर फेकले गेले.यानंतरही नियंत्रण मिळवता न आल्याने कारने काही रिक्षांना धडक दिली. गजबजलेल्या परिसरात झालेल्या अपघातामुळे मोठी गर्दी जमा झाली. मालाड पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. अपघातामध्ये जखमी झालेले सत्रा दाम्पत्य आणि रिक्षातील पाच प्रवाशांना शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. प्रियांका यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर त्यांचे पती मयांक आणि इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.
आरोपीला अटक आणि जामीन
पोलिसांनी घटनास्थळावरून चमणकर यांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून मालाड पोलिसांनी चमणकर यांना अटक केली.सोमवारी त्यांना बोरीवली महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्त करण्यात आले, ही घटना त्याच दिवशी घडली ज्या दिवशी प्रियांका सत्रांच्या कुटुंबीयांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

