मुंबई : मालाड पश्चिममध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात ३४ वर्षीय महिला वकील प्रियांका सत्रा यांचा मृत्यू झाला, तर पती मयंक गंभीर जखमी झाले आहेत. प्रियांका यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्रा दाम्पत्य आपली नऊ वर्षांची मुलगी आणि सात वर्षांच्या मुलासाठी केळी आणि खाऊ घेऊन घरी परत जात होते.
सिग्नलला थांबल्यानंतर अवघ्या ५ ते १० सेकंदातच कारने त्यांना धडक दिली, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
"ते सिग्नलला थांबले होते. ५ ते १० सेकंदातच मागून आलेल्या कारने त्यांना धडक दिली" असे प्रियांका यांचे भाऊ धवल गाडा यांनी 'मुंबई मिरर'ला सांगितले.
मयंक यांनी कुटुंबीयांना काय सांगितले?
अपघातानंतर मयंक यांना भेटणाऱ्या पहिल्या काही नातेवाईकांपैकी एक असलेले प्रियांका यांचे चुलत भाऊ मंथन शाह यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला. त्यांच्या जबाबानुसार, अपघातानंतर काही वेळातच मयंक यांनी त्यांना फोन केला आणि मामलेदारवाडी जंक्शन सिग्नलजवळ अपघात झाल्याचे सांगितले. मयंक यांनी सांगितले होते की, पत्नी प्रियांका हिला अधिक गंभीर दुखापत झाल्याचे दिसत होते. तर त्यांना इतर लोकांनी दुसऱ्या रुग्णालयात नेले होते.मंथन शाह यांनी अन्य नातेवाईकाला संपर्क साधून रुग्णालयांमध्ये चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांना समजले की प्रियांका यांना सुचक रुग्णालयात नेण्यात आले होते, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वैद्यकीय अहवालात मृत्यूचे कारण 'पॉलीट्रामा' (शरीराच्या अनेक भागांना झालेली गंभीर दुखापत) असे नमूद केले आहे.
मयंक यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रियांका यांचे भाऊ धवल गाडायांनी सांगितले की, हेल्मेट घातल्यामुळे ते डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीतून वाचले. नंतर कुटुंबीयांना समजले की आरोपीच्या कारने जंक्शनवर तीन रिक्षांनाही धडक दिली होती, त्यात इतर अनेकजण जखमी झाले होते. आरोपी कृष्णा चमणकर याच्यावर कठोर कलमे लावली जावीत, यासाठी सत्रा कुटुंबीय पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेणार आहेत.
याबाबत संपर्क साधला असता, सहपोलीस आयुक्त मनोज कुमार शर्मा यांनी सांगितले की, वरिष्ठ अधिकारी या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
कोलमडलेले कुटुंब
धवल गाडा यांनी सांगितले की, ते सांताक्रूझ येथे एका कौटुंबिक कार्यक्रमात असताना त्यांच्या आईने त्यांना अपघाताची माहिती देण्यासाठी फोन केला. ते तातडीने सुचक रुग्णालयात पोहोचले, तिथे कुटुंबीयांना प्रियांका यांच्या मृत्यूची बातमी समजली."आम्ही सर्वजण पूर्णपणे कोलमडून गेलो होतो. त्यांना दोन मुले आहेत. प्रियांका-मयंक बाहेर गेले होते आणि मुलांसाठी केळी घेऊन घरी परत जात होते" असे धवल म्हणाले. त्यांनी सांगितले की, सोमवारी प्रियांका यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही मयंक प्रचंड मानसिक तणावाखाली होते. त्यांच्यासाठी काही सेकंदातच सर्व काही बदलून गेले" असे ते म्हणाले. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, सिग्नलवर त्यांची अॅक्टिव्हा थांबलेली असतानाच मागून आलेल्या कारने तिला धडक दिली.

