Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune Crime : लोहगडावरुन केतनला कसं ढकलायचं, लुल्लानगरच्या टेकडीवर केलेली प्रॅक्टिस; पकडलं गेल्यास काय? सिया-चेतनचं प्लॅनिंग समोर

Pune Crime : लोहगडावरुन केतनला कसं ढकलायचं, लुल्लानगरच्या टेकडीवर केलेली प्रॅक्टिस; पकडलं गेल्यास काय? सिया-चेतनचं प्लॅनिंग समोर

म. टा. प्रतिनिधी, पुणे : बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी मुख्य आरोपी सिया गोयल हिला पुण्यातील लुल्लानगर परिसरात नेऊन स्पॉट पंचनामा केला.

येथेच सिया गोयल व चेतन चौधरी यांनी केतन याला दरीत ढकलण्याचा सराव केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

छोट्या टेकडीवर ढकलण्याचा सराव

या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने पोलिसांचा तपास परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुराव्यांवर केंद्रित आहे. गंगाधाम ते लुल्लानगर या रस्त्यावरील छोट्या टेकडीवर सराव केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार त्या ठिकाणी पंचनामा केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी सिया हिला तिच्या राहत्या घरी नेऊनही पंचनामा केला. घटनेच्या दिवशी परिधान केलेले कपडे, मोबाइल आणि अन्य वस्तू जप्त केल्या. घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, याचीही पडताळणी करण्यात आली.

कटात अन्य कोणाचा सहभाग?

या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिस करीत आहेत. आतापर्यंत सियाचा भाऊ साहिल, वडील प्रवीण, आई पूजा यांच्यासह गोयल कुटुंबीयांची चौकशी केली आली आहे; तसेच सिया आणि केतन यांचे लग्न ठरवण्यात मध्यस्थी करणाऱ्या मित्तल दाम्पत्याचा जबाबही नोंदवला आहे. बाली येथे प्री-वेडिंग शूटसाठी जाताना त्यांना मुंबई विमानतळापर्यंत सोडणाऱ्या कॅब चालकाचीही चौकशी केली आहे. या कटात अन्य कोणाचा सहभाग आहे का याबाबत पोलिसांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही.

'तिसऱ्या व्यक्तीला दूर ठेवून रचला कट'

गुन्ह्याचा कोणताही धागा पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला विश्वासात न घेता केतन अग्रवालच्या हत्येचा संपूर्ण कट स्वतःच रचल्याचे तपासात समोर आले आहे. पकडले गेल्यास काय उत्तर द्यायचे, अपघाती मृत्यूचा बनाव कसा उभा करायचा आणि चौकशीला कसे सामोरे जायचे, याचेही त्यांनी आधीच नियोजन केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, केतन अग्रवालचा १८ जूनला लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे भासविण्यात आले. मात्र, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अपघाती मृत्यूची शक्यता कमी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये उष्ण वातावरणात हुडी परिधान करून फिरणाऱ्या तरुणाचा माग काढून पोलिस चेतन चौधरीपर्यंत पोहोचले आणि तपासाला निर्णायक दिशा मिळाली.

केतनच्या मोबाईलमधून डेटा हटवल्याचा संशय

केतन अग्रवाल याच्या मोबाइलमधील काही माहिती सिया गोयलने हटवल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे संबंधित मोबाइल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. केतन दरीत पडण्यापूर्वी त्याचा मोबाइल सियाकडे कसा आला आणि कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी त्यातील कोणताही डेटा हटवण्यात आला होता का, याचा तपास पोलिस करीत आहेत.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims