पुणे : पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेची अपेक्षा केली जाते. पोलीस अराजकता माजवणाऱ्यांपासून जनतेचीसुरक्षा करतात आणि समाजाला त्रास देणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या आरोपींना धडा शिकवतात.
त्यामुळे पोलिसांबद्दल एक वेगळा आदर आहे. तसेच पोलिसांचा गुन्हेगारांना वचक असतो. यामुळे सर्वसामान्य नागरिक पोलिसांकडे आशेने पाहतो. पण पुण्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात पोलिसांनीच खंडणीसाठी एका कुटुंबाचं अपहरण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 6 पैकी 5 पोलिसांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
पुण्यातील विमाननगर परिसरात राहणारे भूषित शर्मा आणि त्यांचे मित्र मोहम्मद हे कुटुंबासह 5 जुलैला फिरायला गेले होते. याच दिवशी दुपारी 2 वाजेच्या सुमारास कामशेत परिसरात पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. तुमच्या गाडीत ड्रग्ज आहेत, असं सांगून पोलिसांनी त्यांचे अपहरण केले. तसेच या पोलिसांकडून अपहरण केलेल्या कुटुंबियांकडून 5 लाख रुपयांची खंडणी देखील मागण्यात आली.
कुटुंबाची सुटका कशी झाली?
भूषित शर्मा यांच्या कुटुंबातील एका मुलाने स्मार्ट वॉचच्या मदतीने नातेवाईकांना मेसेज केला आणि आपल्यासोबत घडलेल्या अपहरणाच्या नाट्यमय घडामोडींची माहिती दिली. यानंतर त्यांच्या नातेवाईकांना पिंपरी चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यांची पथके रवाना केली. यावेळी पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल सहा पोलिसांनी हे कृत्य केल्याचं उघड झालं. या सहापैकी 5 पोलिसांना अटक करण्यात आल्याचे माहिती समोर आली आहे.पोलीस अधीक्षक काय म्हणाले?
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी या प्रकरणावर पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. "या प्रकरणातील 6 जणांपैकी 3 जण हे पोलीस होते. तर इतर 3 वॉर्डन होते. ते देखील पोलिसांना सहकार्य करण्याचे, ट्रॅफीक मॅनेजमेंटचे काम करतात त्यातील होते. 6 पैकी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे", अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दिली.आरोपी पोलिसांनी याआधीही कुणाला त्रास दिलाय का?
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी असलेल्या 6 पोलिसांवर काय कठोर कारवाई केली जाते? ते पाहणं महत्त्वाचं आहे. या पोलिसांवर गुन्हा दाखल होतो का? त्यांच्यावर कठोर कारवाई होते का? त्यांना काही कठोर शिक्षा होते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे या पोलिसांनी याआधीदेखील अशाप्रकारचं कृत्य केलं आहे का? याचादेखील शोध घेणं महत्त्वाचं आहे. या दृष्टीकोनातून तपास होतो का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.
