Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune Hooch Tragedy : कुणाची चार लेकरं पित्याला मुकली; कुणाच्या आईमागून वडिलांचा मृत्यू, पुण्यातील विषारी दारुकांडाने 19 संसारांची राख

Pune Hooch Tragedy : कुणाची चार लेकरं पित्याला मुकली; कुणाच्या आईमागून वडिलांचा मृत्यू, पुण्यातील विषारी दारुकांडाने 19 संसारांची राख

. टा. प्रतिनिधी, पुणे : आयुष्यभर कष्ट करून संसार उभा करणाऱ्या एका निवृत्त बँक कर्मचाऱ्याचा विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची आणखी एक हृदयद्रावक घटना हडपसर परिसरात समोर आली. अशोक रमेश चव्हाण (वय ५२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मागे पत्नी आणि एकुलता एक मुलगा असा परिवार असून, कुटुंबाचा आधारवडच निघून गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अशोक चव्हाण यांनी महेश बँकेत तब्बल ३२ वर्षे शिपाई म्हणून सेवा बजावली. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी संसारासाठी धडपड थांबवली नव्हती. हडपसर येथील गंगा रेसिडेन्सीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून ते काम करीत होते. साधे राहणीमान, कष्टाळू स्वभाव आणि कुटुंबासाठी झटणारा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. पत्नी शारदा या गृहिणी असून, मुलगा यश हा कॅम्प परिसरात टॅटू आर्टिस्ट म्हणून काम करतो. मात्र, विषारी दारूने या कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला. २७ मेच्या रात्री अशोक चव्हाण दारू पिऊन घरी आले. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हडपसरमधील पांढरेमळा परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंनी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. कोणाच्या डोळ्यांसमोर भावाने जीव सोडला, तर कोणाच्या घरातील कर्ता पुरुष अचानक निघून गेल्याने लेकरांचे पितृछत्र हरपले. आयुष्यभर कष्ट करून संसार उभा करणाऱ्या कुटुंबांचा आधार काही तासांतच हिरावला गेला. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

बहिणीच्या डोळ्यांसमोर मृत्यू

पांढरेमळा येथील रहिवासी यशवंत पवार यांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले. यशवंत पवार हे पूर्वी पीएमपीमध्ये नोकरीला होते. मात्र, दारूच्या व्यसनामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. काही दिवसांपासून ते बहीण कल्पना जाधव यांच्याकडे राहत होते. पत्नी, अजय, विजय असे दोन मुले आणि नातवंडांचा हसरा परिवार असूनही पवार यांचे आयुष्य व्यसनाच्या विळख्यात अडकले होते. मात्र, या कुटुंबाला कधी वाटले नव्हते की एका रात्रीत कुटुंबाचा आधार नाहीसा होईल.


२६ मेच्या रात्री आठच्या सुमारास पवार दारू पिऊन घरी आले. 'भाऊ नेहमी घरी जसा येतो तसाच आला होता. मात्र, सकाळी उठल्यावर अचानक त्याला त्रास सुरू झाला,' असे बहिणीने सांगितले. काही वेळातच उलट्या, तोंडाला फेस आणि तडफड सुरू झाली. घरातील कुटुंबीय घाबरले आणि मदतीसाठी धावपळ सुरू झाली; परंतु बहिणीच्या डोळ्यांसमोर काही क्षणांतच यशवंत पवार यांचा मृत्यू झाला. मात्र पोलिसांनी 'हृदयविकाराचा झटका' असे मृत्यूचे कारण सांगितल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

वडिलांचाही आधार गेला...

दीड वर्षांपूर्वी आईचे छत्र हरपले आणि आज विषारी दारूने वडीलही देवाघरी गेले. दत्ता माधवराव सूर्यवंशी (वय ५४) यांचा गुरुवारी मृत्यू झाला. काळे कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण कॉम्प्लेक्समध्ये सात वर्षांपासून सूर्यवंशी कुटुंब राहत आहे. दत्ता सूर्यवंशी हे सुरक्षारक्षक म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मात्र, दारूच्या व्यसनाने अखेर त्यांचाही जीव घेतला. त्यांचा मुलगा दर्शन बोलताना गहिवरून गेला होता. मला दोन बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. मी सर्वांत लहान असून, सलूनमध्ये नोकरी करून घर चालवतो, असे सांगताना त्याच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.

चार लेकरांचे पितृछत्र हरपले

'डोळ्यांनी दिसत नाहीये, पाठ दुखते...' असे म्हणत पत्नीसमोर वेदनेने तडफडणारा विजय शर्मा काही तासांतच कायमचा निघून जाईल, याची कल्पनाही त्यांच्या कुटुंबाला नव्हती. हडपसरमधील पांढरेमळा परिसरात राहणाऱ्या विजय शर्मा (वय ४६) यांचा गावठी दारू प्यायल्यानंतर मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मागे पत्नी, दोन मुली आणि दोन मुलगे असा परिवार असून, कुटुंबाचा एकमेव आधार हरपल्याने घर उघड्यावर पडले आहे. विजय यांनी बिगारी काम करून संसार उभा केला. कष्ट करून चार मुलांना वाढवले. मात्र, दारूच्या व्यसनाने अखेर त्यांचाच जीव घेतला. पोलिसांच्या रेकॉर्डला मृत्यू दारूमुळे झाला अशी नोंद नाही. पोलिसांच्या मृतांच्या यादीत विजय शर्मा यांचे नावच नसल्याने चर्चा रंगली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims