पुणे: माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीन जून महिन्यापासून सुरू होणार असल्याची शक्यता आहे. या मार्गावरील 12 स्थानकांसह ही मेट्रो मार्गिका सुरू होणार आहे. या मेट्रो मार्गिकेवर एकूण 23 स्थानकं असून, मे अखेरपर्यंत या मार्गावरील 12 स्थानकांचं काम पूर्ण करण्याचं पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)चं उद्दिष्ट आहे.
सप्टेंबरमध्ये संपूर्ण मार्गिका
इतर 11 स्थानकांवर सध्या प्रेवश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर पायाबूत सुविधांचे बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या उर्वरित स्थानकांच्या कामाला विलंब होत आहे. अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. हिंजवडी आय-टी पार्कमधील कर्मचारी आणि रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली ही मेट्रो मार्गिका सध्या अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण प्रकल्पाचे 94.2 टक्के काम सध्या पूर्ण झाले आहे. तसेच, या 12 स्थानकांवरील बहुतेक चाचण्या पूर्ण झाल्या असून केवळ सिग्नलिंगच्या तांत्रिक चाचण्या सुरू आहेत.
चाचणी आणि पाहणी पूर्ण
आयुक्त अभिजीत चौधरींनी असेही सांगितले की त्यांनी या मार्गाची स्वतः पाहणी केली असून लवकरात लवकर मेट्रो सुरू करण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. दरम्यान, ही मार्गिका सुरू होताच पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

