Dailyhunt
Pune News: बोगद्यांतून पुणे 'सुपरफास्ट'! शहरातील टेकड्यांमधून तयार करणार दोन मार्ग; 1 तासाचा प्रवास 15 मिनिटांत होणार

Pune News: बोगद्यांतून पुणे 'सुपरफास्ट'! शहरातील टेकड्यांमधून तयार करणार दोन मार्ग; 1 तासाचा प्रवास 15 मिनिटांत होणार

प्रशांत आहेर, पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील वाढती वाहतूककोंडी फोडण्यासाठी दोन महत्त्वाकांक्षी बोगद्यांचा प्रकल्प तातडीने राबविण्याचा आदेश महापालिकेला दिला आहे.

पुणे शहरातील पाषाण-कोथरूड आणि हिंगणे-धनकवडी या दोन मार्गांवर बोगद्यांच्या प्रकल्पांचा नारळ फोडण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. या प्रकल्पांमुळे प्रवासाचा कालावधी सरासरी ४० ते ६० मिनिटांवरून अवघ्या पाच ते १५ मिनिटांपर्यंत कमी होणार असल्याचा दावा केला जात आहे.

पाषाण ते कोथरूड आणि हिंगणे ते धनकवडी या दोन बोगद्यांमुळे गणेशखिंड रस्ता, कोथरूड, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड) आणि सहकारनगर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

पुण्यात दर वर्षी तीन लाख नवीन वाहनांची भर पडते. सन २०२३-२४ अखेर शहरातील नोंदणीकृत वाहनसंख्या ७२ लाखांवर पोहोचली आहे. त्यातच महापालिका हद्द २४३.८४ चौरस किलोमीटरवरून ५१७ चौरस किलोमीटरपर्यंत वाढल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील ताण प्रचंड वाढला आहे. परिणामी, पाषाण, कोथरूड, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, स्वारगेट, कात्रज यांसारख्या प्रमुख मार्गांवर दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील टेकड्यांमधून बोगदा तयार करून 'कनेक्टिंग लिंक' जोडण्याचा पर्याय विकसित करण्यात येत आहे.

पाषाण- कोथरूड बोगदा

सध्या पाषाणहून कोथरूडला जाण्यासाठी चांदणी चौक किंवा सेनापती बापट रस्ता हेच दोन प्रमुख पर्याय आहेत. या दोन्ही मार्गांवर आठ ते नऊ चौक ओलांडावे लागतात. त्यामुळे १० ते ११ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ४० ते ६० मिनिटे लागतात. प्रस्तावित पाषाण- पंचवटी- कोथरूड बोगदा तीन किलोमीटरचा असेल. पंचवटी टेकडीखालून जाणाऱ्या या बोगद्यातून पाषाण रस्ता, पंचवटी रस्ता आणि पौड रस्ता यांना थेट जोडले जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पाषाण-कोथरूड प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटांत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

टेकड्यांखालून थेट पुणे

टेकड्यांखालून रस्ते काढण्याचा आराखडा कागदावर आकर्षक दिसत असला, तरी तो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासनाप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कस लागणार आहे.

असा असेल बोगदा

९३० मीटरचा चार-लेन (२+२) बोगदा आणि उर्वरित अॅप्रोच रोड असतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हिंगणे ते धनकवडी प्रवास केवळ पाच ते १० मिनिटांत शक्य होईल. सिंहगड रस्ता, स्वारगेट, कात्रज, बिबवेवाडी आणि सातारा रस्ता या प्रमुख मार्गावरील ताण कमी होऊन वाहतूक अधिक सुरळीत होण्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

हिंगणे-धनकवडी बोगदा

हिंगणे (सिंहगड रस्ता) ते धनकवडी (सातारा रस्ता) या मार्गावरील थेट संपर्काला तळजाई टेकडीचा मोठा अडसर आहे. त्यामुळे सध्या स्वारगेट किंवा कात्रजमार्गे वळसा घालून प्रवास करावा लागतो. हे ७.५ ते नऊ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी नऊ ते १० चौक आणि ४० ते ५० मिनिटांचा वेळ खर्ची पडतो. यावर उपाय म्हणून हिंगणे- तळजाई - धनकवडी बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे. हा बोगदा एकूण २.४ किलोमीटर लांबीचा असेल.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims