Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune News : दहीहंडीत आक्षेपार्ह डान्स करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, पोलीस आयुक्तांचा इशारा

Pune News : दहीहंडीत आक्षेपार्ह डान्स करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, पोलीस आयुक्तांचा इशारा

श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. गणेशोत्सवापूर्वी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या दहीहंडी उत्सवात अभिनेत्री, अभिनेते तसेच नामांकित खेळाडूंसह विविध सेलिब्रिटींची उपस्थिती राहणार असल्याने उत्सवाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दहीहंडी उत्सवावर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटी तसेच इतर कलाकारांना आमंत्रित केले जाते. मात्र, काही ठिकाणी कार्यक्रमादरम्यान स्टेजवर अश्लील अथवा आक्षेपार्ह नृत्याचे प्रकार घडताना दिसतात. अशा प्रकारांमुळे कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दहीहंडी उत्सवादरम्यान अश्लील डान्स किंवा आक्षेपार्ह प्रकार घडल्यास संबंधित मंडळांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे.

पोलीस आयुक्त काय म्हणाले?

याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पोलीस आयुक्तांनी दहीहंडी आयोजकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. उत्सवाच्या नावाखाली अश्लीलता किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यक्रमाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास पोलिसांकडून त्याची दखल घेऊन संबंधितांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवात लेझर लाईटच्या वापरावर बंदी

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील गणेश मंडळांची समन्वय बैठक घेतली. या बैठकीमध्ये गणेशोत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी मंडळांना विविध सूचना देण्यात आल्या. यंदाच्या गणेशोत्सवात लेझर लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबतही नियम व निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे.

गणपती मंडळांना पुरस्कार

गेल्या वर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून शांततेत आणि संयमाने विसर्जन मिरवणूक पार पाडणाऱ्या गणेश मंडळांचा यावेळी पोलिसांकडून 'श्री मोरया गणपती पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला. या माध्यमातून नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

पोलिसांचं नागरिकांना आवाहन

गणेशोत्सव आणि दहीहंडी हे दोन्ही उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असले तरी उत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही पोलिसांसोबतच आयोजकांची आणि नागरिकांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे दहीहंडी मंडळांनी अश्लील नृत्य, आक्षेपार्ह कार्यक्रम तसेच गर्दीला कारणीभूत ठरणारे प्रकार टाळावेत. गणेश मंडळांनीही लेझर, डीजे आणि ध्वनीप्रदूषणाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे.

नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

यंदाच्या उत्सव काळात पोलिसांकडून विशेष बंदोबस्त आणि नियमभंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याने दहीहंडी आणि गणेश मंडळांनी पोलिसांच्या सूचनांना प्रतिसाद देत उत्सव शांततेत, शिस्तीत आणि सामाजिक सलोखा राखत साजरा करणे गरजेचे आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims