Dailyhunt
Pune News: पुणे रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार, वर्षभरात सहा नवे फलाट उभारणार;  टप्प्या-टप्प्याने कामं होणार

Pune News: पुणे रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार, वर्षभरात सहा नवे फलाट उभारणार; टप्प्या-टप्प्याने कामं होणार

.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे रेल्वे स्थानकाचे 'यार्ड रिमॉडलिंग' आणि नवीन सहा फलाट उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम टप्प्या-टप्प्याने केले जाणार असून, ते पुढील वर्षभरात पूर्ण होईल.

त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार आहे.

पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत रिमॉडलिंगच्या कामाची माहिती दिली. रिमॉडलिंगचे काम पूर्ण केल्यानंतर पुणे रेल्वे स्थानक परिसराचा विकास केला जाणार असून, त्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे, असे वर्मा यांनी सांगितले. या वेळी पुणे रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक पाठक, वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा आदी उपस्थित होते.

कसा होणार विस्तार?

पुणे रेल्वे विभागात सध्या १७०० कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. त्यामध्ये खडकी, हडपसर टर्मिनलचा विकास केला जात असून, त्यासाठी २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर झाला आहे; तसेच रिमॉडलिंग आणि नवीन सहा फलाटासाठी ४०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रिमॉडलिंगचे काम सुरू झाले असून, ते टप्प्या-टप्प्याने केले जाणार आहे. यामध्ये सध्या असलेल्या चार फलाटांचा विस्तार आणि सहा नवीन रेल्वे फलाटांचे काम केले जाणार आहे. हे काम पुढील आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकाचा आजूबाजूचा परिसर विकसित केला जाणार आहे. त्याचा सर्व आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे; तसेच २० रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्टेशन अंतर्गत विकास केला जात आहे. बीड-वडवणी नवीन मार्ग आणि चार स्थानके मंजूर झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

प्रवासी सुरक्षेवर भर

प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने पुणे स्थानकावर १६० उच्च दर्जाचे 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पुणे विभागातील इतर स्थानकांवरही ३८२ 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसवले आहेत. विविध सुरक्षा मोहिमांतर्गत हजारो जणांवर कारवाई करण्यात आली असून, चोरी, फेरीवाले आणि इतर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यात आले आहे. रेल्वे मार्गांच्या दुपदरीकरणासह नवीन लाइन आणि स्थानकांची उभारणीही करण्यात आली आहे; तसेच 'कवच' सुरक्षा प्रणालीच्या अंमलबजावणीतही प्रगती झाली असून, सध्या अनेक ठिकाणी काम सुरू आहे. एकूणच महसूल वाढ, प्रवासी सेवा, सुरक्षा आणि पायाभूत सुविधा या सर्व बाबींमध्ये पुणे रेल्वे विभागाने संतुलित प्रगती साधल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

महसूलात साडेतीन टक्क्यांनी वाढ

पुणे रेल्वे विभागाने आर्थिक वर्ष (२०२५-२६) मध्ये सर्वच क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करीत एकूण दोन हजार २३८ कोटी महसूल मिळवला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ३.७टक्के वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे प्रवासी महसूलात १३ टक्के वाढ झाली असून, त्यामधून रेल्वेला एक कोटी ६५७ कोटींचा टप्पा गाठण्यात आला आहे. प्रवासी संख्येतही ६.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिकीट तपासणी मोहिमेमुळे महसुलात मोठी वाढ दिसून आली असून, या माध्यमातून ३० कोटी महसूल मिळाला आहे. ही वाढ तब्बल ५७.५ टक्के इतकी आहे. याशिवाय व्यावसायिक जाहिरीतीमधून १५.६७ कोटी उत्पन्न मिळाले आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims