Dailyhunt
Pune News: 'शटल सेवे'मुळे हिंजवडी होणार कोंडीमुक्त! 500 पिकअप पॉइंट्स, 80 बस; लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार

Pune News: 'शटल सेवे'मुळे हिंजवडी होणार कोंडीमुक्त! 500 पिकअप पॉइंट्स, 80 बस; लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार

.टा. प्रतिनिधी, पिंपरी: शहरातील सर्वाधिक गर्दीच्या हिंजवडी आयटी हबकडे जाणाऱ्या रोजच्या प्रवासातील वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी 'रूटमॅटिक' या एआय-आधारित कॉर्पोरेट मोबिलिटी कंपनीने 'कोको राइड्स' ही ॲप-आधारित शटल सेवा सुरू केली आहे.

हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन (एचआयए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्या सहकार्याने ही सेवा सुरू झाली असून, 'एचआयए'च्या ८० पेक्षा अधिक कंपन्यांमधील सुमारे सव्वालाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

सेवेचे लोकार्पण

आयटी पार्कमधील इन्फोसिस कंपनीच्या कार्यालयापासून या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. 'एचआयए'चे अध्यक्ष सुब्रमण्यम राधाकृष्णन, 'रूटमॅटिक'चे संस्थापक व मुख्याधिकारी श्रीराम कन्नन आणि कार्यकारी संचालक कविता रामचंद्रगौडा आदी या वेळी उपस्थित होते.

'एचआयए'च्या सदस्य कंपन्यांना या बससेवेतील आसने आरक्षित करण्यासह नवीन मार्गांचे नियोजन करता येणार आहे. कोको राइड्स सेवेअंतर्गत सुरुवातीला ८० हून अधिक बस ७० पेक्षा जास्त मार्गांवर धावणार आहेत. या सेवेअंतर्गत पुणे शहरातील ५०० पेक्षा अधिक पिकअप पॉइंट्सना जोडले जाणार आहे. दररोज सुमारे २० हजार प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, ही सेवा पूर्णपणे ॲप-आधारित असून, कर्मचारी ठरावीक वेळापत्रक आणि निश्चित दरांवर (१०० रुपयांपासून) आसन आरक्षित करू शकतात.

10 किमी अंतरासाठी 34 मिनिटे

टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स २०२५नुसार पुणे हे देशातील दुसरे आणि जगातील पाचवे सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेले शहर आहे. शहरातील कोंडीचे प्रमाण ७१.१ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, १० किमी अंतर पार करण्यासाठी सरासरी ३४ मिनिटे लागतात. त्यामुळे वर्षाला जवळपास १५८ तास वाहतुकीत वाया जातात. अशा परिस्थितीत 'कोको राइड्स'सारख्या नियोजित आणि उच्च क्षमतेच्या सार्वजनिक शटल सेवा नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

या सेवेबाबत कन्नन यांनी सांगितले, की तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या कामगार संख्येमुळे प्रवासाच्या सुविधा कमी पडत आहेत. 'कोको राइड्स'सारख्या सामायिक वाहतूक सेवांमुळे प्रवास अधिक सुटसुटीत, विश्वासार्ह आणि कार्यक्षम होईल. पुण्यानंतर ही सेवा इतर शहरांतही विस्तारण्याचा आमचा मानस आहे.

मेट्रोझिप पाच वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू....

हिंजवडी येथे काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरापासून कार्यालयापर्यंत आणि परत आणणारी सेवा, पाच वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. २०१४ मध्ये हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन (एचआयए) आणि एमआयडीसी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या सेवेला यापूर्वी सुप्रीम ट्रान्स कॉन्सेप्ट्स, महिंद्रा लॉजिस्टिक्स, प्रसन्ना पर्पल आणि फोर्ड ऑफिसराइड यांसारख्या परिवहन क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी चालवले होते.


ही लोकप्रिय सेवा एप्रिल २०२० मध्ये कोव्हिडमुळे अचानक बंद करण्यात आली. त्यानंतरच्या काळात वर्क फ्रॉम होम, हायब्रिड वर्किंग आणि फ्लेक्सी टाइमिंग यांसारख्या बदललेल्या कामकाजाच्या पद्धतींमुळे अशा वाहतूक व्यवस्थेची गरज कमी झाली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, कंपन्या पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे मेट्रोझिप सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून, या वेळी ती कोको राइड्स च्या माध्यमातून चालवली जाणार आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims