म. टा. वृत्तसेवा, भोर: स्मशानभूमी पाण्यात गेल्यामुळे तालुक्यातील पसुरे गावातील लोकांना अंत्यविधीसाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमी चारही दिशेने पाण्याने पूर्ण वेढल्यामुळे मृतदेह जागेवर नेण्यासाठी नातेवाईक व स्थानिकांना कमरेभर पाण्यातून वाट काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
भाटघरच्या काठावर पसुरे गावआहे. पाण्याची सोय पाहून धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ स्मशानभूमीचे बांधकाम केले आहे. मात्र, ते चुकीच्या ठिकाणी झाल्यामुळे दर वर्षी पावसाळ्यातील चार महिने अंत्यविधीसाठी असा कठीण प्रसंग उद्भवतो, असा आरोप स्थानिकांनी केला. पावसाळ्यात खूप पाणी आले, की स्मशानभूमीजवळ जाणारा रस्ता पाण्यात जातो.
मृतदेह नेताना दमछाक
गेले काही दिवस शहर आणि तालुक्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे भाटघर धरण शंभर टक्के भरले असून, बॅकवॉटरचे पाणी सर्वत्र पसरले आहे. शनिवारी गावात एका व्यक्तीचे निधन झाले. अंत्यविधीसाठी नागरिक स्मशानभूमीकडे निघाले. चारही बाजूंनी पाण्याने वेढा दिल्यामुळे मृतदेह हातात उंच धरून उचलावा लागला; शिवाय सुमारे ३० ते ४० फूट अंतरावर असलेल्या स्मशानभूमीपर्यंत तो नेतना नातेवाइकांची पुरती दमछाक झाली. कमरेपेक्षा जास्त पाणी आणि लाल मातीच्या गाळातून चालणे खूप अवघड आणि त्रासदायक झाले होते. स्मशानभूमीतील ओट्यावरील खड्ड्यात पाणी साठले. त्यामुळे दुसऱ्या मोकळ्या जागेत अग्निसंस्कार करण्यात आले.
सध्या स्मशानभूमीच्या दुसऱ्या बाजूला १० ते १२ फूट खोल पाणी साचले आहे. चुकून एखादी व्यक्ती पाय घसरून खाली पडण्याचा धोकाही संभवतो, असे स्थानिकांनी सांगितले.
या गावाने धरणासाठी खूप मोठी जमीन दिली आहे. आम्हाला कोणत्याच अत्यावश्यक सुविधा मिळत नाहीत. किमान अंत्यविधीसाठी सुरक्षित व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी मागणी जमलेल्या ग्रामस्थांनी या वेळी केली.

