Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune Police Raid: पुणे पोलीस आणि FDA कडून भेसळखोरांचं मोठं रॅकेट उघड, १३ जणांना बेड्या; १ हजार लिटर दुधात ५०० लिटर शाम्पू-केमिकलचे दूध!

Pune Police Raid: पुणे पोलीस आणि FDA कडून भेसळखोरांचं मोठं रॅकेट उघड, १३ जणांना बेड्या; १ हजार लिटर दुधात ५०० लिटर शाम्पू-केमिकलचे दूध!

पुणे: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागल्यापासून राज्यभरात भेसळखोरांवर धाडसत्र सुरू आहे. अशातच आज पुणे स्थानिक गुन्हे शाखने एकाच वेळी पाच जिल्ह्यांत कारवाई करत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल आणि अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर, सांगली, मंचर, सिल्लोड, अकलूज या परिसरात ही कारवाई करण्यात आली असून १३ जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच तब्बल अडीच ते तीन कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटबाबत पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाला टीप मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्यासह इतर अधिकारी असे ३० जणांचे पथक आणि अन्न व औषध प्रशासनाचे २० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाच जिल्ह्यांमध्ये धाडी टाकल्या. या धाडीमध्ये दूध भेसळीचे पुण्यातील मंचर हे मुख्य केंद्र असल्याचे आढळून आले. एक हजार लिटर दुधात ही टोळी ५०० लिटर केमिकलच्या साहाय्याने तयार केलेले दूध मिसळत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

दरम्यान, भेसळ करणारे हे नराधम दुधात शाम्पू आणि दूध पावडरचा वापर करत असल्याचं आढळून आलं आहे. याद्वारे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यात येत असल्याने आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सिन्नर तालुक्यातही 'एफडीए'चे छापे

अन्नभेसळीविरोधात राज्यभर सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने शनिवारी सिन्नर तालुक्यातील शहा, कारवाडी, पुतळेवाडी आणि विघनवाडी परिसरात छापेमारी केली. दूध संकलन केंद्रे आणि खवानिर्मिती केंद्रांवर झालेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून एफडीएच्या पथकाने सिन्नर तालुक्यात धडक देत दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी केली. दुधामध्ये पावडर किंवा अन्य पदार्थांची भेसळ होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे. कारवाईदरम्यान विविध ठिकाणांहून नमुने ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली. काही साहित्यही जप्त करण्यात आल्याचे समजते. मात्र, कोणते किती नमुने घेतले याबाबतची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती. या कारवाईसाठी वावी पोलिस ठाण्याकडून दोन पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली होती. शहा गावात कारवाई सुरू असल्याचे समजताच काही किराणा दुकाने, पानटपऱ्या तसेच खाद्यपदार्थ विक्रीची आस्थापने दिवसभर बंद राहिल्याचे दिसून आले. या संदर्भात प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims