चंढिगढ : पंजाबमधील जालंधर येथे विवाहित महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर, तिच्या पतीवर कौटुंबिक छळ, आर्थिक फसवणूक आणि लग्नाबाहेरील संबंधांचे आरोप करण्यात आले आहेत. तिच्या कुटुंबीयांनी पतीला त्वरित अटक करण्याची आणि तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पंजाबच्या जालंधरमधील कपूरथला येथे कार्यरत असलेली सरकारी डॉक्टर- डॉ. मीनाक्षी सूद, बुधवारी सकाळी जालंधरमधील तिच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी तिच्या वडिलांच्या जबाबाच्या आधारे भारतीय न्याय संहिताच्या कलम १०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पतीवर मानसिक-शारीरिक छळाचा आरोप
मीनाक्षीच्या कुटुंबीयांनी तिचा पती डॉ. पियुष सूद याच्यावर अनेक वर्षांपासून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. डॉ. पियुष सूद हा जालंधरमध्ये 'नॅशनल आय केअर हॉस्पिटल' चालवतो. त्याने तिच्या नावे परस्पर कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप मीनाक्षीच्या माहेरच्या मंडळींनी केला. त्याचे रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.मीनाक्षीचे वडील प्रमोद कुमार यांच्या माहितीनुसार, या जोडप्याचा विवाह ऑक्टोबर २०१८ मध्ये झाला होता. त्यांनी असा दावा केला की, 'थार' गाडी खरेदी करण्यासाठी त्यांच्या मुलीच्या नावे कर्ज काढण्यात आले होते आणि ती स्वतःच्या पगारातून त्याचे हप्ते भरत होती.
अडीच कोटींचे परस्पर कर्ज
कुटुंबाने असाही आरोप केला की, डॉ. पियुष यांनी कार आणि रुग्णालयाशी संबंधित कामांसाठी मीनाक्षीच्या नावे सुमारे ४५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र तिला नुकतेच समजले की, तिच्या नावे आणखी २.५ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे दिसून आले, तेव्हा परिस्थिती अधिकच बिघडली."घर घेण्याच्या नियोजनासाठी ती बँकेत गेली असता, तिला समजले की तिच्या नावे सुमारे २.५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्या कागदपत्रांवर तिच्या स्वाक्षऱ्याही नव्हत्या," असे तिच्या वडिलांनी सांगितले; या प्रकारामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास झाल्याचा दावाही त्यांनी केला.
मारहाण करुन माफी मागायचा
कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, वैवाहिक वादामुळे मीनाक्षी जुलै २०२५ पासून आपल्या पतीपासून वेगळी राहत होती आणि घटस्फोट घेण्याचा विचार करत होती. तिच्या आईने आरोप केला की, वाद झाल्यानंतर जावई अनेकदा फोन करुन मीनाक्षीला मारहाण केल्याचे कबूल करायचा आणि नंतर माफी मागायचा. तसेच, यापूर्वीही आपल्या मुलीचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा दावा तिच्या वडिलांनी केला.रुग्णालयातील महिलेशी संंबंध
डॉ. पियुषचे त्याच्याच रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिलेशी संबंध होते, असा आरोपही तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मीनाक्षीला संशय आल्याने तिले रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यात ते दोघे एकत्र असल्याचे दिसून आले, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तपासाचा भाग म्हणून हे फुटेज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

