Dailyhunt
Q4 Results: Adani Enterprises ला चौथ्या तिमाहीत 221 कोटींचा तोटा, पण उत्पन्नात मोठी भरारी, गुंतवणूकदारांसाठी लाभांश जाहीर

Q4 Results: Adani Enterprises ला चौथ्या तिमाहीत 221 कोटींचा तोटा, पण उत्पन्नात मोठी भरारी, गुंतवणूकदारांसाठी लाभांश जाहीर

Adani Group Q4 Results: गुरूवारी बाजार बंद झाल्यानंतर अदानी समूहाच्या अदानी एंटप्राइजेजने जाहीर केलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीला 221 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नात मात्र मोठी वाढ झाली आहे.

मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 3 हजार 945.7 कोटींचा नफा झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत अदानी एंटरप्राईजेजच्या नफ्यात 105.6 टक्क्यांची घट झाली असून यामागे नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत ते जाणून घेऊया.

कंपनीच्या तोट्याचे कारण काय?

कंपनीचा हा तोटा नवीन प्रकल्पांमुळे झाला आहे. विशेषतः नवी मुंबई विमानतळ आणि नवीन कॉपर प्लांट यांसारख्या मोठ्या प्रकल्पांच्या मालमत्तेवर लागलेल्या घसरणीमुळे नफ्यावर परिणाम झाला आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोणताही वन-टाइम नफा कंपनीला झाला नाही. तसेच नवीन प्रकल्पांच्या सुरुवातीच्या टप्प्यात येणारा मोठा खर्च आणि ऑपरेशन्सचा वाढलेला व्याप या तात्पुरत्या तोट्याला कारणीभूत ठरला आहे.

तरीही उत्पन्नात मोठी वाढ

कंपनीला या तिमाहीत तोटा झाला असला तरी, ऑपरेशन्सपासून मिळणारे उत्पन्न सुमारे 20 ते 21 टक्क्यांनी वाढले आहे. जे 32 हजार 439 कोटींपर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हे उत्पन्न 26 हजार 965 कोटी रुपये इतके होते.

लाभांशाची घोषणा

अदानी इंटरप्राइजेजच्या तोट्यानंतरही कंपनीने तिच्या गुंतवणूकदारांना निराश केलेले नाही. संचालक मंडळाने प्रति शेअर 1.30 रुपये म्हणजेच 130 टक्के लाभांश देण्याची घोषणा केली आहे. यासाठीची रेकॉर्ड डेट 12 जून 2026 ही ठरवली गेली आहे. या तारखेपर्यंत ज्यांच्या खात्यात अदानी एंटरप्राइजेजचे शेअर्स असतील, त्यांनाच हा लाभांश मिळेल. रेकॉर्ड डेट नंतर साधारणपणे 30 दिवसांच्या आत लाभांशाचे पैसे थेट गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात जमा होतील.

गुंकवणूकदारांची प्रतिक्रिया काय असेल?

कंपनीने लाभांश जाहीर करून गुंतवणूकदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आणि त्यानंतर शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने शेअर बाजार सलग तीन दिवस बंद राहील, त्यामुळे या निकालावर गुंतवणूकदारांची नेमकी काय प्रतिक्रिया असेल हे आता थेट 4 मे रोजी बाजार उघडल्यावरच स्पष्ट होईल.

शेअर बाजार बंद भाव

दरम्यान गुरूवारी शेअर बाजार 2 लाख 410.50 रुपयांवर बंद झाला, पण गेल्या महिनाभरात स्टॉक 31 टक्के वाढल्याने आता सोमवारच्या व्यवहारांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims