पुणे : निवांत अंध विकासालयातील कला आणि वाणिज्य शाखेच्या ३६ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. त्यातील रिद्धी पाटील या विद्यार्थिनीने लेखनिक न घेता संगणकावर स्वत: टायपिंग करीत बारावीची परीक्षा दिली होती.
रिद्धीने परीक्षेत ८६.८३ टक्के गुण मिळवले. कला शाखेतून आदित्य मंगल या विद्यार्थ्याने ८४.८३ टक्के गुण प्राप्त केले. निवांत संस्थेर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात, अशी माहिती संस्थेच्या उमा बडवे यांनी दिली.
पहाटेच्या थंडीत आई-वडील कचऱ्याच्या गाड्या ढकलत असताना, त्यांच्याच मुलांनी स्वप्नांचा उजेड पेटवून यशाचे आभाळ कवेत घेतले आहे. गरिबी, अस्थिरता आणि समाजाच्या पूर्वग्रहांशी झुंज देत पुणे जिल्ह्यातील कचरावेचकांच्या मुला-मुलींनी बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, वस्त्यांमध्ये सध्या आनंद आणि अभिमानाचे वातावरण आहे. कॉमर्स शाखेतून सर्वाधिक ७१, कला शाखेतून २९ आणि विज्ञान शाखेतून १३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. स्वच्छ संस्था आणि कष्टकरी पंचायतीकडून मिळालेली शैक्षणिक मदत, वह्या-पुस्तके; तसेच विशेष शिकवणी वर्ग यामुळे या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आधार मिळाला. अनेकांनी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून दिवसा कामात हातभार लावून यशाचा मार्ग शोधला. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे केवळ गुण नाहीत, तर संघर्ष, जिद्द आणि आशेची कहाणी दडलेली आहे. कचरावेचकांच्या वस्त्यांतून उमललेली ही यशकथा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
'पुन्हा पेटलेली जिद्द'
कळस वस्तीत राहणाऱ्या मंगल गोविंद सकट यांची कहाणी थक्क करणारी आहे. घरची परिस्थिती खालावल्याने १५ वर्षांपूर्वी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. आयुष्य कचरा वेचण्यात आणि धुणी-भांड्यांत अडकले; पण मनातल्या शिक्षणाच्या ज्योतीने हार मानली नाही. पंचायतीच्या मदतीने त्यांनी १७ नंबरचा फॉर्म भरला. दिवसाचे कष्ट संपवून रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला. अखेर या जिद्दीला यश मिळाले. वयाच्या या टप्प्यावर त्यांनी ६९ टक्के गुण मिळवत सर्वांना प्रेरणा दिली.
HSC Topper's Story: डोळ्यांत अंधार, पण स्वप्नांत लख्ख प्रकाश! १००% दृष्टी नसलेल्या आदित्यने मिळवले बारावीत ८४ टक्के गुण
'खाकी वर्दीचे स्वप्न'
हडपसरमधील अर्चना आणि शंकर कांबळे रोज कचरा संकलन करून संसार चालवतात. त्यांची मुलगी संध्या हिने या कष्टांची जाणीव ठेवून अभ्यासात झोकून दिले. कॉमर्स शाखेतून ८२.१७ टक्के गुण मिळवून यश संपादन केले. आई-वडिलांच्या घामाचे मोल जाणून, आता संध्याचे लक्ष्य स्पष्ट आहे. पोलिस दलात भरती होऊन खाकी वर्दीत देशसेवा करायची.
चिकाटी अन् आत्मविश्वास...
श्रुती लोंढे (७५ टक्के) हिने वडिलांच्या निधनानंतर घरची जबाबदारी सांभाळून शिक्षण सुरू ठेवले. बहिणीच्या मदतीने घरीच अभ्यास करून तिने यश मिळवले. तिचे स्वप्न आर्किटेक्ट बनून स्वतःचे आणि कुटुंबाचे आयुष्य घडवणे हे आहे. वारजे येथील संगीता निर्मल (७४.८३ टक्के) हिने वडिलांच्या मृत्यूनंतर आईने घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवून अभ्यास केला. आता तिने 'एमबीए' करण्याचे ध्येय ठरवले आहे. कोथरूडच्या पूजा रावत (७२.८३ टक्के) हिनेही परिस्थितीशी दोन हात करून अभ्यास सुरू ठेवला. चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तिने पोलिस होण्याचे स्वप्न बाळगले आहे.

