Dailyhunt
Rahul Roy Downfall: कोण होतास तू काय झालास तू! आशिकी फेम राहुल रॉयवर कंटेंट क्रिएटरसोबत रील बनवण्याची वेळ, चाहत्यांना अवस्था पाहवेना

Rahul Roy Downfall: कोण होतास तू काय झालास तू! आशिकी फेम राहुल रॉयवर कंटेंट क्रिएटरसोबत रील बनवण्याची वेळ, चाहत्यांना अवस्था पाहवेना

मुंबई: ९० च्या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट 'आशिकी' मधून रातोरात सुपरस्टार झालेला अभिनेता राहुल रॉय सध्या त्याच्या 'डाउनफॉल' अर्थात करिअरला लागलेल्या उतरती कळा यामुळे चर्चेत आलाय.

एकेकाळी स्टारडम अनुभवलेल्या अभिनेत्याला आता एका कंटेंट क्रिएटरसोबत व्हिडिओ बनवण्याची वेळ आली आहे.

राहुल रॉयच्या डाउनफॉलची चर्चा

राहुल रॉयचा या कंटेंट क्रिएटरसोबत म्युझिक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता तो पुन्हा चर्चेत आलाय.डॉ. वनिता घडगे देसाई या कंटेंट क्रिएटरसोबत राहुल रॉयनेंकाही रोमँटिक गाण्यांवर रील बनवले आहेत. मात्र, या व्हिडिओमध्ये राहुलची देहबोली आणि त्याचे हावभाव पाहून चाहते आश्चर्य व्यक्त करत आहे. अनेकांनी याला त्याचा 'डाउनफॉल' असल्याचं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओंमध्ये राहुल रॉय त्याच्या गाजलेल्या 'तेरे दर पर सनम' आणि 'आशिकी'मधील गाण्यांवर रील करताना दिसत आहे. या रीलमध्ये राहुल अत्यंत अवघडलेला वाटतोय. तसंच त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखं तेज दिसत नसल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रया
एका युझरनं कमेंट केली की, "एवढ्या मोठ्या सुपरस्टारवर हे रील करण्याची वेळ का आली? काय नाईलाज झाला असावा याचा?" तर दुसऱ्यानं लिहिलं, "राहुल सरांना अशा परिस्थितीत पाहणं खूप त्रासदायक आहे."

चाहत्यांकडून पाठिंबा
काही लोकांनी राहुलला ट्रोल केलं असलं, तरी त्याच्या खऱ्या चाहत्यांनी त्याची पाठराखण केली आहे. २०२० मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) आला होता, ज्यातून तो हळूहळू सावरत आहे.

अन् राहुल रॉयचं स्टारडम गेलं...

दरम्यान,एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याची ही अवस्था पाहून सोशल मीडियावर सध्या चिंताही व्यक्त केली जात आहे. 'आशिकी'च्या तुफान यशानंतर राहुल रॉयकडे निर्मात्यांच्या रांगा लागल्या होत्या. एका मुलाखतीत राहुलनं स्वतः कबूल केलं होतं की, यशाच्या नशेत आणि असुरक्षिततेपोटी त्यानं अवघ्या ११ दिवसांत ४७ चित्रपट साइन केले होते. एकाच वेळी इतक्या प्रकल्पांवर काम केल्यामुळं अभिनयाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आणि त्याचे एकामागून एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले.




चुकीच्या चित्रपटांची निवड
राहुल रॉयनं 'जुनून', 'फिर तेरी कहानी याद आयी' आणि 'गुमराह' सारख्या काही चांगल्या चित्रपटांत काम केलं, पण प्रेक्षकांच्या मनात त्याची 'आशिकी' मधील प्रतिमा इतकी घट्ट होती की ते त्याला इतर भूमिकांत स्वीकारू शकले नाहीत. अनेक चित्रपट अर्धवट राहिले, तर काही बी-ग्रेड दर्जाचे असल्याने त्याच्या स्टारडमला मोठा धक्का बसला.

आजारपण
२०२० मध्ये 'एलएसी - लिव्ह द बॅटल' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कारगिलमध्ये राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक आला. या गंभीर आजारपणामुळं त्यांच्या बोलण्यावर आणि शरीराच्या हालचालीवर मर्यादा आल्या. या कठीण काळात सलमान खानने त्यांना आर्थिक मदत केल्याचंही समोर आलं होतं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims