मुंबई: ९० च्या दशकात रातोरात स्टार झालेला राहुल रॉय आता वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आलाय. एक काळ असा होता जेव्हा या राहुल रॉयनं आपल्या 'आशिकी'नं तरुणाईला वेड लावलं होतं. पण काही असे निर्णय त्याच्या करिअरला खाली खेचण्यासाठी कारणीभूत ठरले.
आता त्याच्यावर कंटेंट क्रिएटरसोबत रील व्हिडिओ बनवण्याची वेळ आली आहे.
राहुल रॉयचे .डॉ. वनिता घडगे देसाई या कंटेंट क्रिएटरसोबतचे काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. यानंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागल्याचं म्हटलं गेलं. पण त्याच्या चाहत्यांना मात्र त्यानं असे रील व्हिडिओ बनवणं काही आवडलं नाही. त्याच्यावर हे रील्स व्हिडिओ करायची का वेळ आली, असा प्रश्न चाहते विचारत होते. आता त्यांच्या या प्रश्नाला राहुल रॉयनं उत्तर दिलं आहे.
व्हायरल व्हिडिओवर राहुल रॉयचे स्पष्टीकरण
गेल्या काही दिवसांपासून राहुल रॉयचे काही इंस्टाग्राम रील्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंवरून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असून, अखेर राहुल रॉयने यावर आपले मौन सोडलं आहे.डॉ. वनिता घाडगे देसाई नावाच्या एका इंस्टाग्राम कंटेट क्रिएटर असलेल्या महिलेनं राहुल रॉयसोबतचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये राहुल रॉय त्याच्या 'आशिकी' आणि 'फिर तेरी कहानी याद आयी' सारख्या सुपरहिट गाण्यांवर रील बनवल्याचं दिसत आहे. मात्र, या व्हिडिओंमध्ये राहुल रॉयचा वावर काहीसा अवघडलेला असल्याचं नेटकऱ्यांच्या लक्षात आलं. अनेकांनी यावरून चिंता व्यक्त केली, तर काहींनी त्याला ट्रोल देखील केलं."तो माझा नाईलाज होता..."
या रील्सवर बोलताना राहुल रॉयने आपली बाजू मांडली. तो म्हणाला, "ते व्हिडिओ फारसे व्हायरल झाले असे मला वाटत नाही... पण ते करणं माझे (कंपल्शन)नाईलाज झाला होता. आता मी पुन्हा असें काही करणार नाही. तुम्हा सर्वांचे आभार. जर तुम्हाला हे व्हिडिओ पाहून माझी काळजी किंवा चिंता वाटली असेल तर, मला काम शोधायला मदत करा...असंही त्यानं म्हटलं.राहुलच्या या उत्तरावरून तो या व्हिडिओंसाठी पूर्णपणे तयार नव्हता किंवा कोणाच्या दबावाखाली त्यानं हे काम केलं असावं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अशीही चर्चा
तर राहुलनं यावर स्पष्टीकरण दिलं असलं तरी, तो कदाचित मोठ्या आर्थिक अडचणीतून जात असावा, असा अंदाजही चाहते बांधत आहेत.
दरम्यान,राहुल रॉयनं २०२० मध्ये 'एलएसी - लाइव्ह द बॅटल'च्या शूटिंगदरम्यान ब्रेन स्ट्रोकचा सामना केला होता. त्यानंतर प्रदीर्घ उपचार आणि जिद्दीच्या जोरावर तो पुन्हा उभा राहिला आहे. त्याच्या आरोग्याची स्थिती पाहता, अशा प्रकारचे व्हिडिओ समोर आल्यानं चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

