Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Raigad Rain : रायगडातील तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली; प्रशासन सतर्क, नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा

Raigad Rain : रायगडातील तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली; प्रशासन सतर्क, नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा

अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. शनिवारी (४ जुलै) सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या जिल्हा प्रशासनाच्या नदी पाणी पातळी अहवालानुसार, रोहा तालुक्यातील अंबा नदी (नागोठणे बंधारा), कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) तसेच खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (लोहोप) यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.

संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अहवालानुसार रोहा तालुक्यातील अंबा नदीची सध्याची पाणीपातळी ८.१५ मीटर असून इशारा पातळी ८.०० मीटर आहे. कुंडलिका नदीची पाणीपातळी २३.१० मीटर नोंदविण्यात आली असून ती २३.०० मीटर इशारा पातळीच्या पुढे गेली आहे. खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदीची पाणीपातळी २०.६० मीटर असून ती २०.५० मीटर इशारा पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे या भागांमध्ये विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

दुसरीकडे, महाड तालुक्यातील सावित्री नदीची पाणीपातळी ४.०५ मीटर असून ती इशारा पातळी ६.०० मीटरपेक्षा कमी आहे. कर्जत तालुक्यातील उल्हास नदीची पाणीपातळी ४३.४५ मीटर असून ती इशारा पातळी ४८.१० मीटरच्या खाली आहे. तसेच पनवेल तालुक्यातील गाढी नदीची पाणीपातळी ४.१५ मीटर असून तीही इशारा पातळी ६.०० मीटरच्या खाली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हवामान विभागाने पुढील काही तासांतही रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असल्याने नदी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस आणि स्थानिक प्रशासन सतर्क ठेवण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्र, बंधारे आणि पुलांवर जाणे टाळावे, अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्याला शनिवारसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. यानंतर रविवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच येत्या सोमवारी म्हणजेच 6 जुलैसाठी पावसाचा पुन्हा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. तसेच 7 जुलैला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानंतर 8 जुलैला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचं सध्याचं रौद्ररुप पाहता पुढचे दोन दिवस जास्त महत्त्वाचे आहेत.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims