Dailyhunt
Rakesh Bedi Apology : बंदी असलेला शब्द बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलणं भोवलं, धुरंधरच्या जमिल जमाली यांना मागावी लागली जाहीर माफी

Rakesh Bedi Apology : बंदी असलेला शब्द बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलणं भोवलं, धुरंधरच्या जमिल जमाली यांना मागावी लागली जाहीर माफी

धुरंधर 2 या सिनेमात रणवीर सिंहसोबतच अभिनेते राकेश बेदी यांनी महत्वपूर्ण पात्र साकारले आहे. त्यांची जमिल जमाली ही भूमिका सिनेमात टर्निंग पॉइंट ठरली आणि ती आता प्रचंड गाजतेय. पण अशातच त्यांच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडिओ समोर आल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

त्या व्हिडिओत अभिनेत्याने समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना 'हरिजन' या संज्ञेचा वापर केला. या शब्दप्रयोगावरून टीका झाल्यानंतर, त्यांनी आता जाहीर माफी मागितली आहे.

राकेश बेदी यांच्या एका जुन्या व्हिडिओ क्लिपमधून सुरू झालेला हा मुद्दा आता एका नव्या वादात रूपांतरित झाला आहे; या व्हिडिओमुळे लोक त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत असून त्यांच्या माफीनाम्याची मागणी केली आहे.

राकेश बेदी यांना टीकेचा सामना का करावा लागला?


आझाद समाज पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष कैलाश जैस्वार यांनी हा व्हिडिओ ऑनलाइन शेअर केल्यानंतर हे प्रकरण वादात सापडले. या व्हिडिओ क्लिपमध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याविषयी चर्चा करताना राकेश बेदी यांनी 'हरिजन' या संज्ञेचा वापर केल्याचे ऐकू आले. ही संज्ञा आता मोठ्या प्रमाणावर अनुचित मानली जाते आणि भारतात तिच्या अधिकृत वापरास बंदी घालण्यात आली आहे. जैस्वार यांनी सांगितले की त्यांनी स्वतः अभिनेत्याशी संवाद साधला असून, त्यांना जाहीर माफी मागण्याची विनंती केली होती.

राकेश बेदी यांनी जाहीर माफी मागितली


वाद जास्त चिघळत चालला आहे ही बाब लक्षात येताच, राकेश बेदी यांनी माफी मागितल्याचा एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला. या व्हिडिओमध्ये, सदर शब्द वापरण्यास मनाई आहे याची आपल्याला कल्पना नव्हती आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असे या अभिनेत्याने स्पष्ट केले. ते म्हणाले, "नमस्कार मित्रांनो, मी राकेश बेदी. काही महिन्यांपूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये मी असे नमूद केलेले की, आपल्या देशात बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, हरिजन आणि मागास समाजातील घटकांसाठी अफाट कार्य केले आहे. त्यांच्या उद्धारासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले."

"मी हे हेतुपुरस्सर केले नाही" -राकेश बेदी


त्यांनी पुढे सांगितले, "तथापि, जर मी वापरलेल्या 'हरिजन' या शब्दामुळे कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्याबद्दल माफी मागतो. मी हे जाणीवपूर्वक म्हटले नव्हते. हा शब्द वापरण्यास मनाई आहे, याची मला कल्पना नव्हती."

'धुरंधर 2' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन


राकेश बेदी यांचे 'धुरंधर' आणि त्याचा सिक्वेल 'धुरंधर 2' मधील त्यांच्या कामासाठी सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालत असून, चित्रपटातील कलाकारांचीही सतत चर्चेत होत आहे. जागतिक कमाईच्या बाबतीत हा चित्रपट वेगाने 1600 कोटींच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. भारतात तर या चित्रपटाने 1000 कोटींचा टप्पा ओलांडला असून, अशी कामगिरी करणारा हा बॉलिवूडमधील पहिलाच हिंदी चित्रपट ठरला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims