Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ramesh Mhatre Arrest : डोंबिवलीतील डॉक्टरांना मारहाण, राज्यभर संताप; अखेर शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, 24 तासांत कारवाई

Ramesh Mhatre Arrest : डोंबिवलीतील डॉक्टरांना मारहाण, राज्यभर संताप; अखेर शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, 24 तासांत कारवाई

ठाणे (डोंबिवली) : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे. शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना घटनेनंतर जवळपास २४ तासांनी विष्णुनगर पोलिसांनी अटक केली.

राज्यभरातून वाढत असलेला संताप, डॉक्टरांचं आंदोलन आणि राजकीय दबाव यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात आता एकूण चार आरोपी गजाआड झाले आहेत. मंगळवारी शास्त्रीनगर रुग्णालयात रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांशी वाद घालत डॉ. वैभव साळुंखे आणि डॉ. सृष्टी बाविस्कर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी दोन परिचारिकांशीही अरेरावी करण्यात आल्याची तक्रार आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली होती.

विष्णुनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं

या प्रकरणात म्हात्रे यांचे समर्थक रमेश पवार, प्रकाश निकम आणि अक्षय कारंडे यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी असलेले रमेश म्हात्रे मोकाट असल्याने डॉक्टर संघटना आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. अखेर बुधवारी दुपारी विष्णुनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

कठोर कारवाईची मागणी

घटनेनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं. राज्यभरातील डॉक्टर संघटनांनीही या घटनेचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली. डॉक्टरांवर हात उगारणाऱ्याला कोणतीही सवलत देऊ नये, अशी भूमिका विविध संघटनांनी घेतली होती.

रोहित पवार- विनायक राऊतांनी दिला होता इशाारा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट देत डॉक्टरांची भेट घेतली. बुधवारी संध्याकाळपर्यंत अटक झाली नाही, तर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

श्रीकांत शिंदेंची भूमिका अन् अटकेची कारवाई

या प्रकरणानंतर शिंदे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही स्पष्ट भूमिका घेतली. डॉक्टरांवरील हल्ल्याचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन केलं जाणार नाही. रमेश म्हात्रे यांच्यावर पक्षाकडून कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर पक्षाने म्हात्रे यांना शिस्तभंगाची नोटीसही बजावली. राज्यभरातून वाढलेल्या दबावानंतर अखेर पोलिसांनी मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांना अटक केली. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, न्यायालयात त्यांना हजर केल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पडणार आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims