अभिनेता राकेश बापट आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. याव्यतिरिक्त, त्याने टेलिव्हिजन क्षेत्रातही स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
बिग बॉस हिंदी ते बिग बॉस मराठी त्याने गाजवलं. चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, राकेश बापट याने 'तुम बिन' या चित्रपटातून पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटापासून आपली एक भक्कम ओळख निर्माण केली होती. आज वाढदिवसानिमित्त राकेश बापटला एक छान सरप्राइज मिळालं आहे.
आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेता राकेश बापटला स्टार प्रवाहकडून वाढदिवसाचं खास गिफ्ट मिळालंय. राकेश बापटच्या वाढदिवसाच्याच दिवशी स्टार प्रवाहच्या 'तुझ्याकडे तुला मागणे' या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली असून, या मालिकेत राकेश अत्यंत प्रभावी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व साकारणार आहे. अभिमान सरदेसाई असं त्याच्या पात्राचं नाव असून अतिशय प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमा असलेला यशस्वी उद्योजक आणि राजकीय नेत्याच्य़ा भूमिकेत राकेश दिसणार आहे.
राकेश बापटच्या चाहत्यांसाठी ही मालिका एक प्रकारे पर्वणीच ठरेल. कारण त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. यापूर्वी त्याने नवरी मिळे हिटलरला या झी मराठीवरील मालिकेत लीड रोल केला होता. या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली. त्यानंतर तो बिग बॉस मराठी मध्ये झळकला. तिथेही त्याने आपल्या कधी संयमी तर कधी आक्रमक अशा स्वभावाने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले. आपल्या मुलाने आपल्या मायबोलीत एकदा तरी काम करावं अशी त्याच्या आईची इच्छा होती त्यामुळेच त्याने मराठी मालिका करायचं ठरवलं होतं असं त्याने एखा मुलाखतीत सांगितलं.
आता पुन्हा एकदा तो स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार असल्याने त्याच्या आईसाठीसुद्धा हा सुखद अनुभव असेल. अद्याप या मालिकेबाबत इतक कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. केवळ मालिकेचे नाव व राकेश बापटच्या पात्राबाबत माहिती समोर आली आहे. ही मालिका आक्टोबर महिन्यात सुरू होणार असल्याचे नव्या प्रोमोमध्ये सांगितले आहे.

