Dailyhunt
Riyan Parag Vaping : रियान पराग व्हॅपिंग प्रकरण, भारत सरकारच्या कायद्यात 1 वर्षांची शिक्षा, IPL अधिकारी काय म्हणाले?

Riyan Parag Vaping : रियान पराग व्हॅपिंग प्रकरण, भारत सरकारच्या कायद्यात 1 वर्षांची शिक्षा, IPL अधिकारी काय म्हणाले?

मुंबई : मंगळवारी रात्री पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्याच्या थेट प्रक्षेपणादरम्यान राजस्थान रॉयल्सचा कर्णधार पराग ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढताना (व्हॅपिंग करताना) दिसला. न्यू चंडीगड येथे ही लढत झाली.

'राजस्थान' ने ही लढत सहा विकेटनी जिंकली. या लढतीत १६ चेंडूंत दोन चौकार व दोन षटकारांसह २९ धावा केल्या. 'आयपीएलमध्ये यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. आयपीएल खेळणारे अनेक खेळाडू ई-सिगारेटचे सेवन करतात; पण ते ड्रेसिंग रूममध्ये असे करत नाहीत. एवढ्या कॅमेऱ्यांच्या उपस्थितीत असे करणे खूप जोखमीचे आणि बेजबाबदारपणाचे आहे. पराग उघडपणे व्हॅपिंग करताना पकडला गेल्यामुळे, बीसीसीआयला कारवाई करण्यास भाग पाडले जाऊ शकते,' असे आयपीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

व्हॅपिंग म्हणजे काय?

व्हॅपिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेट किंवा तत्सम उपकरणाचा वापर करून वाफ श्वासावाटे आत घेणे. ई-सिगारेटमध्ये निकोटीन द्रव स्वरूपात असते. त्याचे वाफेत रूपांतर होते. ही वाफ वापरकर्ता श्वासावाटे आत घेतो आणि बाहेर सोडतो. अनेक लोक व्हॅपिंगला सिगारेटला एक 'सुरक्षित' पर्याय मानतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते ते पूर्णपणे सुरक्षित नाही. यामध्ये असलेल्या निकोटीनमुळे व्यसन लागू शकते आणि फुफ्फुसांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होऊ शकतात. निकोटीनमुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही वाढते.

शिक्षा काय?

भारत सरकारने २०१९ मध्ये ई-सिगारेटच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातली आहे. कायद्यानुसार, पहिल्या गुन्ह्यासाठी दोषी व्यक्तीला एक वर्षांपर्यंतचा कारावास किंवा एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. नियमानुसार कोणतीही व्यक्ती, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, ई-सिगारेटचे उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री किंवा वितरण करू शकत नाही. ई-सिगारेट आरोग्यासाठी हानिकारक आहे.

ड्रेसिंग रूममधील फुटेज दाखवण्याचा निर्णय बीसीसीआयचा नसून प्रसारणकर्त्यांचा असतो. मात्र, या घटनेनंतर कदाचित याचा फेरविचार केला जाऊ शकतो. असे असले तरी, परागचे वागणे बेजबाबदार होते आणि अशा गोष्टीचा बचाव करणे कठीण आहे. एक उत्कृष्ट खेळाडू अशा प्रकारे धूम्रपान करताना दिसणे हे जनतेसमोर चांगले उदाहरण नाही, असं आयपीएलचा एक अधिकारी म्हणाला.

'ड्रेसिंग रूमकडे कॅमेरा नको'

स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मुंबईत झालेल्या आयपीएलमधील सहभागी सर्व संघांच्या कर्णधारांच्या बैठकीत खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममधील गोपनीयतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. काही कर्णधारांनी थेट प्रक्षेपणादरम्यान कॅमेरे ड्रेसिंग रूमकडे वळवण्यावर आक्षेप घेतला होता.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims