Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सगुण-निर्गुण: आकळावा श्रीपती येणे पंथे

सगुण-निर्गुण: आकळावा श्रीपती येणे पंथे

-डॉ. दिलीप शेठमागील लेखात जीवाच्या उत्क्रांतीचे वर्णन आपण पाहिले. आज आत्म्याच्या सर्वव्यापित्वाचे वर्णन पाहू. माउली म्हणतात, 'आता ऐसियाहीवरी काई। सांगो व्याप्तीची नवाई। येथ दुजे नाहीची घेई।

सर्वत्र मी गा।।' आता माझ्या व्याप्तीची अपूर्वता यापेक्षा अधिक काय सांगू! अर्जुना, या विश्वात सर्व ठिकाणी माझ्याशिवाय दुसरे कोणी नाही. मीच सर्व ठिकाणी आहे असे समज. भगवंत म्हणतात, मी देहापुरता मर्यादित नसून सर्व चराचरात व्यापलो आहे. तेजातील तेज, शीतलतेतील शीतलता माझ्यामुळेच आहे.

सर्व भूतांचे धारण, पोषण मीच करतो. मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा, प्राण व अपानाने संयुक्त वैश्वानर अग्नीरूप होऊन चार प्रकारचे अन्न पचवतो. भक्ष्य म्हणजे चावून खाण्याचे, भोज्य म्हणजे पिण्याचे, लेह्य म्हणजे चाटण्याचे, चोष्य म्हणजे चोखण्याचे असे चारही प्रकारचे अन्न पचविणारा मीच आहे. स्वामी मकरंदनाथ 'गीतादर्शन' या ग्रंथात म्हणतात, 'सर्व प्राणीमात्रांच्या अंतर्यामी राहून मीच सर्व काही करतो. जीवाच्या जीवनाला आवश्यक असणारा प्रकाश, जीवाचे धारण, पोषण, अन्नपचन, जीवाच्या बुद्धीतील स्मृती, ज्ञान इत्यादी सर्व व्यवहार माझ्यामुळे घडतात.

माउली उदाहरण देतात, की एकाच स्वाती नक्षत्राचे पाणी, ते शिंपल्यामध्ये मोती होते व सर्पात विष होते. सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्या संगतीत, मार्गदर्शनाखाली साधना करून ज्ञान प्राप्त होते. सद्गुरू सांगतात, 'चिद्रुपदीपम् तिमिरापहारम्।' ज्ञानाच्या प्रकाशात सर्वत्र ते परमात्मतत्त्व भरून राहिलेले आहे, अशी अनुभूती येते.

स्वामी स्वरूपानंद म्हणतात, 'सदा स्वरूपानुसंधान। हेचि भक्ति हेचि ज्ञान।।' स्वामी माधवनाथ म्हणतात, 'आपल्या स्वरूपाचे नित्य स्मरण ठेवणे यातच सर्व साधना अंतर्भूत होतात.' माउली हरिपाठात म्हणतात, 'संतांचे संगती मनोमार्गगती। आकळावा श्रीपती येणे पंथे।।' पुढे भगवंत अर्जुनाला सांगतात, या जगात क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष आहेत. या क्षर व अक्षर पुरुषांहून अगदी वेगळा, श्रेष्ठ उपाधिरहित व एकाकी असा आणखी एक तिसरा उत्तम पुरुष आहे. याविषयी पुढील लेखात पाहू.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims