लोकप्रिय अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम संभावना सेठ हिनं गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. लग्नाच्या १० वर्षांनंतर संभावना आणि तिचा पती अविनाश द्विवेदी लवकरच आई-बाबा होणार आहेत.
संभावनाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली .
संभावना आणि अविनाश यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी "आम्ही प्रेग्नंट आहोत" (We Are Pregnant) असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे हे जोडपं सरोगसीच्या माध्यमातून आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे.
सोशल मीडियावरील 'ती' खास पोस्ट
संभावना आणि अविनाश यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. एका फोटोत त्यांच्या हातात लहान बाळाचे बूट दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत त्यांनी हातात एक पोस्टर धरलं आहे ज्यावर "Baby Coming Soon" असं लिहिले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले:"आम्ही प्रेग्नंट आहोत! आमची सर्वात सुंदर कथा आता निर्मितीच्या टप्प्यावर आहे. प्रेम, आशा आणि सरोगसीच्या माध्यमातून आमचा प्रवास सुरू झाला आहे. आता फक्त प्रतीक्षा..."
आई होण्यासाठीचा संघर्ष
संभावनासाठी हा क्षण अत्यंत भावनिक आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून ती आई होण्यासाठी प्रयत्न करत होती. आपल्या व्ह्लॉग्सच्या माध्यमातून तिनं अनेकदा तिचा कठीण प्रवास चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
आई होण्यासाठी संभावनाने तब्बल ७ वेळा IVF प्रक्रियेचा आधार घेतला होता.काही वर्षांपूर्वी तिने नैसर्गिकरित्या गर्भधारणा केली होती, परंतु दुर्दैवाने तिचा गर्भपात झाला. या प्रक्रियेदरम्यान तिला अनेक इंजेक्शन आणि औषधांमुळं शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं, ज्याबद्दल तिनं मोकळेपणानं चर्चा केली होती.
सेलेब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव
संभावना आणि अविनाश यांच्या या आनंदाच्या बातमीवर मनोरंजन विश्वातील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. भारती सिंह, गौहर खान, रश्मी देसाई आणि अनेक भोजपुरी कलाकारांनी या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अपत्यप्राप्तीसाठी धडपड करणाऱ्या संभावनाच्या आयुष्यात अखेर हा सुवर्णक्षण आला असून, ४५ व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतल्यानं याची चर्चा होत आहे.

