Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Sanjay Khan Zeenat Aman Fight : संजय खानमुळे झीनत अमानचे डोळे तिरपे झाल्याचा आरोप, लेकीचा खुलासा- माझे वडील नाही, तिची आईच जबाबदार!

Sanjay Khan Zeenat Aman Fight : संजय खानमुळे झीनत अमानचे डोळे तिरपे झाल्याचा आरोप, लेकीचा खुलासा- माझे वडील नाही, तिची आईच जबाबदार!

1978 च्या काळात अभिनेते संजय खान आणि झीनत अमान यांच्या लग्नाबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. शिवाय त्यावेळी संजय खान यांनी झीनत अमान यांना मारहाण केल्याने त्यांच्या डोळ्याला दुखापत झाल्याचा आरोपही करण्यात आला होता.

त्यावेळी संजय खान हे आधीच झरीन खान यांच्याशी विवाहित होते, त्यांना मुलेही होती. अलीकडेच एका मुलाखतीत, संजय यांची मुलगी फराह खान अलीने या अफवांवर प्रतिक्रिया दिली आणि त्या खोट्या असल्याचे म्हटले.

फराह खान अलीने तिचे वडील आणि झीनत अमान यांचे लग्न झाले होते या बातमीला दुजोरा दिला, परंतु तिच्या मते वडिलांना झीनत यांना कधीही मारहाण केली नव्हती. वडिलांचे झीनत अमान यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल विचारले असता फराह म्हणाली, "त्यावेळी मी खूप लहान होते, त्यामुळे मला फारसे काही आठवत नाही. तेव्हा मी साधारण 9 किंवा 10 वर्षांची होते."

'माझ्या वडिलांनी झीनत यांना मारहाण केल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार'


फराह खान अली म्हणाली, "मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, सोशल मीडियावर पसरलेली ती खोटी बातमी होती. ज्यात माझ्या वडिलांनी झीनत अमान यांना मारहाण केली आणि त्यांच्या डोळ्याला दुखापत केली, असा दावा केला गेला होता. पण ती पूर्णपणे निराधार आहे; कारण माझ्या वडिलांनी माझ्या आईवर किंवा त्यांच्या कोणत्याही मुलीवर कधीही हात उचलला नाही. ते अशा प्रकारचे हिंसक व्यक्ती नाहीत जे एखाद्या महिलेवर हात उचलतील." विकी लालवानी यांच्या शोला दिलेल्या मुलाखतीत फराहने हे सांगितले.

झीनत यांच्या आईला डोळ्यांशी संबंधित एक विकार होता त्यामुळेच....


फराह खान अलीने पुढे सांगितले, "मला माहित असल्यानुसार, माझ्या आईने मला सांगितले होते की झीनत अमान यांच्या आईला डोळ्यांचा एक विकार होता. त्यांचा एक डोळा आकाराने लहानही होता. त्यामुळे, झीनत अमान यांना असलेली समस्या ही अनुवांशिक होती, प्रसारमाध्यमांत सांगितल्याप्रमाणे नव्हती. माझी आई अत्यंत प्रामाणिक व्यक्ती आहे आणि तिने मला सांगितले होते की माझ्या वडिलांनी झीनत अमान यांच्यावर कधीही हात उचलला नव्हता. त्यामुळे, माझ्या वडिलांनी त्यांना मारहाण केल्याची जी निरर्थक चर्चा केली जाते, ते पूर्णपणे खोटी आहे. मला आनंद आहे की आज मी हे कॅमेऱ्यासमोर सांगू शकते, कारण मला हे स्पष्ट करायचे आहे की ती गोष्ट खरी नाही."

झीनत अमान यांच्यामुळे संजय खान आणि झरीन यांचा संसार जवळजवळ मोडकळीस आला होता.


फराह खान अलीने तिचे वडील संजय आणि झीनत अमान यांच्यातील संबंधांबद्दल भाष्य केले; तिने सांगितले की, या प्रकरणामुळे तिच्या पालकांचे वैवाहिक आयुष्य जवळजवळ संपुष्टात आले होते. मात्र, तिची आई अत्यंत खंबीर स्त्री होती, फराहच्या म्हणण्यानुसार, तिचा भाऊ झायेदचा जन्म झाल्यानंतर तिची आई घर सोडून गेली होती. तिने तिला आणि मुलाला वडिलांकडेच सोडले होते, पण कालांतराने ती परत आली.

झरीन खान यांनी झीनत अमान यांना मारहाण केली होती का?


त्या वादात तिच्या आईने झीनत अमान यांना मारहाण केली होती, या अफवा फराहने फेटाळून लावल्या. ती म्हणाली, "तुम्हाला खरोखर वाटते का की माझी आई दुसऱ्या एखाद्या महिलेशी भांडण करेल आणि तिला मारेल? नाही, माझी आई तशी नाही. ती अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यामुळे, ही गोष्ट खोटी आहे. जेव्हा तिने आम्हाला याबद्दल सांगितले, तेव्हा ती म्हणाली की माझ्या वडिलांचा झीनत अमान यांच्याकडे ओढा होता, त्यामुळे त्यांनी केवळ झीनत यांना दोष दिला नाही; त्या काळात त्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असू शकतील. पण मला खात्री आहे की, माझ्या वडिलांनी झीनत अमान यांना मारहाण केली नव्हती."

'माझ्या वडिलांनी कधीही कोणावर हात उचलला नाही'


फराह पुढे म्हणाली, "मी या गोष्टीची खात्री देऊ शकते कारण माझ्या वडिलांनी कधीही कोणावर हात उचलला नाही. तरुणपणी, स्त्रियांच्या उपस्थितीत कोणीही अपशब्द वापरल्यास ते त्याला जाब विचारायचे; कारण स्त्रियांसमोर अश्लील किंवा अपमानास्पद भाषा वापरली जाऊ नये, असे त्यांचे ठाम मत होते. मला एक घटना आठवते, जेव्हा आम्ही 'चायना गार्डन'मध्ये होतो. तिथे एक अभिनेता होता, मी त्याचे नाव घेणार नाही. तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि स्त्रिया व मुलांसमोर अपशब्द वापरू लागला; तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला जाब विचारला. माझे वडील जुन्या विचारांचे आणि मूल्यांवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत; स्त्रियांचे रक्षण केले पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे, असे त्यांना वाटते. त्यामुळे, ती अफवा पूर्णपणे खोटी आणि निरर्थक आहे."

'विवाह आणि घटस्फोट मुस्लिम रितीरिवाजांनुसार झाले'


फराह खान अलीने झीनत अमान आणि संजय खान यांच्या लग्नाबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा दुजोरा दिला. ती म्हणाली, "हो, त्या काळात त्यांचे लग्न झाले होते. ते लग्न मुस्लिम रितीरिवाजांनुसार पार पडले होते आणि त्यांचा घटस्फोटही मुस्लिम पद्धतीनुसारच झाला. मी माझ्या वडिलांना याबद्दल कधीच विचारले नाही, कारण मला तशी गरज वाटली नाही. माझ्या आईने त्यांना माफ केले होते आणि ती त्या गोष्टींतून पुढे निघून गेली होती."

झीनत अमान यांना मारहाण केल्याच्या आरोपावर संजय खान यांची प्रतिक्रिया


फराह खान अलीने तिचे वडील संजय खान यांनी झीनत यांना मारहाण केल्याची बातमी फेटाळली असली, तरी खुद्द अभिनेत्याने त्यांच्या 'द बिग मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' या आत्मचरित्रात या विषयावर भाष्य केले आहे. याव्यतिरिक्त, एका रेडिओ कार्यक्रमात संजय खान म्हणाले, "1981 ते 1984 या कालावधीचा विचार केला तर तिने अनेक चित्रपटांत काम केले होते आणि तिचे डोळे अतिशय सुंदर होते. मात्र, नंतरच्या काळात तिच्या आईप्रमाणेच तिचे डोळेही थोडेसे तिरपे झाले. ही एक अनुवांशिक बाब होती, तरीही तिला मीच कानशिलात मारली असल्याचा ठपका माझ्यावर ठेवण्यात आला. मी तिला कधीच कानाखाली मारली नाही."

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims