अशा धोकादायक पार्श्वभूमीवर महाबळेश्वर, जावळी आणि पाटण तालुक्यातील महत्वाच्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोयना आणि कृष्णा नदीला पूर आल्याने छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राचे 'मिनी काश्मीर' मानल्या जाणाऱ्या महाबळेश्वर, पाचगणीच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे.
धोकादायक रस्त्यांची वाहतूक बंद
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. डोंगर उतारावरील माती सैल झाल्यामुळे दरडी कोसळत आहेत. काही ठिकाणी भूस्खलनामुळे रस्ते खचले आहेत. महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यातील धोकादायक बनलेल्या रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे. हे मार्ग वळवले
रस्ता खचल्याने सातारा-कास-बामणोली-तापोळा-महाबळेश्वर मार्ग तात्पूर्ता बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतुक मांगर-पारूट ते झोळाची खिंड मार्गे वाळविण्यात आली आहे.पाटण तालुक्यातील डिचोली-नवजा-हेळवाक हा रस्ता देखील खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोयना नेहरू उद्यान ते कामरगाव मार्गाने वळविण्यात आली आहे. प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. तसेच मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाबळेश्वर, पाटण आणि जावळी तालुक्यातील अनेक कुटुंबांचे स्थलांतर सुरू आहे.घाटमाथ्यावर गंभीर परिस्थिती
घाटमाथा आणि डोंगराळ भागात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी रस्ते निसरडे झाले असून दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नद्या, ओढे आणि धरणांतील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ झाली आहे. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.दरड कोसळण्याचे आणि रस्ते खचण्याचे सत्र सुरुच
महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यात पावसामुळे दरडी कोसळण्याचे आणि रस्ते खचण्याचे सत्र सुरू झाले आहे. त्याचबरोबर कोयना आणि उपनद्यांना पूर आल्यामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर
मोरणा-गुरेघर, कण्हेर, वीर, तारळी धरणासह सह लघु पाटबंधारे प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. कोयना धरणात प्रति सेकंद ७९,७०८ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ लक्षणीय होत आहे.