मोबीन खान, शिर्डी: शिर्डी-नाशिक महामार्गावर रविवारी दुपारी भीषण अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. सावळीविहीर हद्दीत राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस आणि एर्टिगा कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलहून शिर्डीकडे येणारी एसटी बस आणि नाशिकच्या दिशेने जाणारी एर्टिगा कार यांच्यात हा अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. तसेच एसटी बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर मदतकार्यासाठी धावपळ
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने बाहेर काढून शिर्डी येथील साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
या अपघातात मृत झालेल्या दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी महामार्गावरील सुरू असलेल्या रस्ते कामामुळे वाहनचालकांचा अंदाज चुकला असावा, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.
वाहतुकीवर परिणाम, कोंडीची स्थिती
अपघातानंतर काही काळ शिर्डी-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दुर्घटनाग्रस्त वाहनांमुळे रस्त्याच्या एका बाजूला मोठी कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला हटविण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
तसेच अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना दूर ठेवत मदतकार्य सुरळीतपणे पार पाडले.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची नोंद शिर्डी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

