Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी वाहतूक नियोजन; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा आदेश

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी वाहतूक नियोजन; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा आदेश

मुलकुमार जैन, रायगड : महाराष्ट्रासाठी 6 जून हा अत्यंत गौरवाचा दिवस मानला जातो. कारण या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगड येथे राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे शिवप्रेमींसाठी हा खूप मोठा दिवस आहे.

दरवर्षी किल्ले रायगड येथे राज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतं. राज्यासह देशभरातील लाखो शिवप्रेमी यावेळी रायगडवर दाखल होतात. दरवर्षी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण कृतीतून शिवराज्याभिषेक दिवस सोहळा साजरा केला जातो. हा सोहळा नेमका कसा साजरा केला जाईल, याबाबत काल कोल्हापुरात राज्यभिषेक सोहळा समितीने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. यानंतर आता वाहतुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

किल्ले रायगड येथे ५ आणि ६ जून २०२६ रोजी होणाऱ्या भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घातली आहे. लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या आदेशानुसार ५ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते ६ जून २०२६ रोजी रात्री १० वाजेपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकण फाटा-नागोठणे ते कशेडी घाट या मार्गावर तसेच माणगाव-निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव-ढालघर फाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला आणि महाड-नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गांवर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होणार आहेत. शिवाय कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य, शासकीय यंत्रणांची वाहने आणि अन्य व्यवस्थापनाशी संबंधित वाहने मोठ्या प्रमाणात या मार्गांवरून प्रवास करणार आहेत. अशा परिस्थितीत मुंबई-गोवा महामार्गावरील आधीच मोठ्या प्रमाणात असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघात किंवा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि सुखकर व्हावा तसेच सोहळ्यादरम्यान कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी ही विशेष वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने तसेच रुग्णवाहिका यांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित यंत्रणांना अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims