Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Siya Goyal: 'सिया पॉइंट' पाहण्यासाठी लोहगडावर झुंबड; आता थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, काय मागणी केली?

Siya Goyal: 'सिया पॉइंट' पाहण्यासाठी लोहगडावर झुंबड; आता थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, काय मागणी केली?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: यंदाच्या पावसाळ्यात साहसी पर्यटक केवळ 'सिया पॉइंट' पहायचे म्हणून येत आहेत. लोहगडाची अशा घटनेमुळे बदनामी होत असून 'सिया पॉइंट' हे नाव इंटरनेटवर लोकेशन म्हणूनही प्रसिद्धी मिळवत आहे.

यामुळे लोहगडासारख्या ऐतिहासिक किल्ल्याची आणि जागतिक वारसा स्थळाची बदनामी होत असून यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली आहे.
लोहगडावरील घटनेमध्ये दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. मात्र या घटनेनंतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर लोहगडाची बदनामी सुरू झाली असून ही महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशासाठी धोक्याची घंटा आहे, असे गिर्यारोहण महासंघाने म्हटले आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र लिहिण्यात आले आहे.

लोहगड हा केवळ पर्यटनस्थळ नसून महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा आहे. . अशा गडाची ओळख एखाद्या गुन्हेगारी घटनेशी जोडणे, त्या ठिकाणाला नवीन नाव देणे किंवा त्यावर विनोद, मीम्स, रील्स आणि सनसनाटी स्वरूपातील मजकूर प्रसारित करणे, हा आपल्या इतिहासाचा आणि समाजाच्या भावनांचा अवमान आहे. गेल्या काही दिवसांत लोहगडावरील एका कड्याचा 'सिया पॉइंट' असा उल्लेख समाजमाध्यमांवर आणि काही डिजिटल माध्यमांमध्ये केला जात असून, गुगल मॅपवरही अशा प्रकारचे उल्लेख दिसून येत आहेत. परिणामी, त्या ठिकाणी केवळ उत्सुकतेपोटी नागरिकांची गर्दी होत आहे.

ऐतिहासिक गड-किल्ले हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांची ओळख इतिहासाने व्हावी, गुन्हेगारी घटनांनी नव्हे. त्यामुळे डिजिटल माध्यमांमध्ये ऐतिहासिक स्थळांची बदनामी करणाऱ्या चुकीच्या नामकरणावर, दिशाभूल करणाऱ्या मजकुरावर आणि सनसनाटी प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने स्वतंत्र धोरण तयार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांनाही संवेदनशील संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे महासंघाने या पत्रात नमूद केले आहे.

धोरणाची आवश्यकता

व्यावसायिक प्री-वेडिंग शूट, फॅशन शूट, जाहिराती, सोशल मीडिया कंटेंट निर्मिती यासाठी स्पष्ट धोरण, पूर्वपरवानगी, आचारसंहिता आणि उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईची तरतूद असावी. गड-किल्ल्यांचा सन्मान व पावित्र्याच्या संरक्षणासाठी दीर्घकालीन राज्यस्तरीय धोरण आखाावे, अशी मागणी गिर्यारोहकांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims