मुंबई: मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.मानखुर्द परिसरात बुधवारी ,२९ एप्रिल, रात्री मोठी वाहतूक कोंडी झाल्यानं नवी मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं.
मानखुर्द परिसरात एमएमआरडीएच्या उड्डाणपुलाच्या बांधकामाचं काम सुरू होतं. या ठिकाणी वापरण्यात येणारे ड्रिलिंग मशीन रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आलं होतं. याचदरम्यान जमीन खचली आणि क्रेन दुचाकीवरून कोसळली. दरम्यान, या घटनेचा वाहतुकीवरही परिणाम झाला. सायन-पनवेल महामार्गावरील वाहतून दीर्घकाळ विस्कळीत झाली होती. मंगळवारच्या घटनेनंतर बुधवारी उशिरापर्यंत येथील वाहतूक पूर्वपदावर आली नव्हती.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील या वाहतूक कोंडीत अडकली होती.मुंबईहून पुण्याला जात असताना मानखुर्द उड्डाणपुलावर सोनाली तब्बल पाच तास वाहतूक कोंडीत अडकली होती. या परिस्थितीचा व्हिडिओ शेअर करत तिनं आपला संताप आणि भीती व्यक्त केली आहे.
नेमकं काय घडलं?
सोनाली बुधवारी रात्री तिच्या खाजगी कारनं पुण्याच्या दिशेनं निघाली होती. मात्र, मानखुर्द पुलावर पोहोचताच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं तिची गाडी एकाच जागी थांबली. तब्बल ५ तास उलटूनही वाहतूक इंचभरही पुढं सरकत नव्हती.
सोनालीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं की,मी गेल्या पाच तासांपासून मानखुर्द पुलावर एकाच ठिकाणी अडकले आहे. मी पुण्याच्या दिशेने चालले होते, पण माझ्या मागे आणि पुढे फक्त वाहनांच्या रांगा दिसत आहेत. ही परिस्थिती अतिशय भयंकर आणि भीतीदायक आहे.
प्रशासनाकडून प्रतिसाद नाही
या भीषण कोंडीत अडकल्यानंतर सोनालीने ट्रॅफिक कंट्रोल रूमशी संपर्क साधला होता. मात्र, तिथून केवळ "संयम ठेवा" असं उत्तर मिळाल्याचं तिनं सांगितलं. आम्ही मागेही जाऊ शकत नाही आणि पुढं जाण्याचा मार्गही मोकळा नाही. आम्हाला भूक लागली आहे असंही आता म्हणता येत नाही, कारण परिस्थिती त्या पलीकडे गेली आहे, अशा शब्दांत तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या.
इतर सेलिब्रिटींनाही बसला फटका
दरम्यान, सोनाली कुलकर्णीप्रमाणेच अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि कोरिओग्राफर फुलवा खामकर यांनाही या ट्रॅफिकचा फटका बसला. गौतमीनं सोनालीच्या पोस्टवर कमेंट करत सांगितले की, ती देखील त्याच कोंडीत अडकली होती.

