Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सॉरी मम्मी-पप्पा! रुद्राभिषेकानंतर आदर्शची एक्झिट; रक्षाबंधनाच्या तोंडावर 3 बहि‍णींचा भाऊ गेला

सॉरी मम्मी-पप्पा! रुद्राभिषेकानंतर आदर्शची एक्झिट; रक्षाबंधनाच्या तोंडावर 3 बहि‍णींचा भाऊ गेला

खनऊ: रक्षाबंधनाच्या तोंडावर तीन बहि‍णींच्या एकुलत्या एका भावानं जगाचा निरोप घेतला आहे. घरात आनंदाचं वातावरण असताना काळानं अचानक घाला घातला. तीन बहिणी रक्षाबंधनाची आतुरतेनं वाट पाहात होत्या.

पण आता त्यांच्यावर भावाच्या फोटोला राखी बांधण्याची वेळ आली आहे. आदर्शच्या अकाली निधनानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आदर्श एक दिवसापूर्वीच घरात झालेल्या रुद्राभिषेकाच्या कार्यक्रमानंतर लखनऊला परतला होता. यानंतर त्यानं अचानक टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. त्याच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली. आदर्श मृत्यूसमयी १८ वर्षांचा होता. मूळचा संत कबीर नगर जिल्ह्यातील महेरवाचा रहिवासी असलेला आदर्श मिश्रा लखनऊमधील एका खासगी महाविद्यालयात बीटेकच्या दुसऱ्या वर्गात शिकत होता.

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी गावात रुद्राभिषेकाचा कार्यक्रम होता. त्यात सहभागी होण्यासाठी आदर्श घरी आला होता. त्यानं कुटुंबासोबत वेळ घालवला. मग रविवारी तो लखनऊसाठी रवाना झाला. वडील प्रमोद मिश्रा यांनी स्वत: त्याला बसमध्ये बसवून दिलं. ही आदर्श सोबतची अखेरची भेट असेल, याची पुसटशीही कल्पना त्यावेळी कुटुंबाला नव्हती.

मंगळवारी सकाळी आदर्श फोनवरून आई, वडिलांशी बोलला. पण त्यानंतर पुढील काही तासांनी त्याची तब्येत बिघडल्याची माहिती मित्रांकडून कुटुंबाला समजली. आदर्शला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही बातमी समजताच कुटुंब लखनऊला रवाना झालं. रुग्णालयात पोहोचेपर्यंत आदर्शची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण बुधवारी उपचारादरम्यान त्यानं अखेरचा श्वास घेतला.

पोलिसांना आदर्शच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली. त्यात त्यांनी आई, वडिलांची माफी मागितली आहे. 'मम्मी-पप्पा सॉरी. मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. सगळ्यांनी मला माफ करा,' असा मजकूर चिठ्ठीत आहे. आदर्शनं टोकाचं पाऊल का उचललं, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे आदर्शच्या मृत्यूचं गूढ कायम आहे.

आदर्श तीन बहि‍णींचा एकुलता एक भाऊ होता. त्यामुळे रक्षाबंधनाचा सण त्याच्या कुटुंबासाठी कायमच खास असायचा. यावेळीही आदर्शच्या बहिणी त्याची वाट पाहात होत्या. पण रक्षाबंधनाआधी आदर्शनं जीवन प्रवास थांबवला. ज्या घरात रक्षाबंधनाची लगबग सुरू होती, तिथे आता आक्रोश सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी कुटुंबाला भेटून गेलेल्या आदर्शनं मरण का कवटाळलं, असा प्रश्न त्याच्या बहि‍णींना पडला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims