Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ST Bus: एसटीची स्वच्छतागृहे आता मोफत; ७८व्या वर्धापनदिनानिमित्त महामंडळाचा निर्णय; प्रवास स्वच्छ व सुखद होणार

ST Bus: एसटीची स्वच्छतागृहे आता मोफत; ७८व्या वर्धापनदिनानिमित्त महामंडळाचा निर्णय; प्रवास स्वच्छ व सुखद होणार

.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ७८व्या वर्धापनदिनानिमित्त आज, १ जूनपासून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच, यंदा ७८ हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

याशिवाय प्रवाशांना एसटीतील सर्व स्वच्छतागृहांचा मोफत वापर करता येणार आहे. या स्वच्छता मोहिमेआधी, म्हणजे १५ एप्रिलपासून महामंडळाने प्रतितिकीट दोन रुपये अधिभार लागू केला आहे.

अधिक सुविधा उपलब्ध होणार

दोन ते १० रुपये घेऊनही एसटी स्थानक, आगारातील स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. स्थानक-आगार परिसरात अस्वच्छता आणि पाणपोईंची दुरवस्था आहे. यामुळे प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत स्थानक आणि आगार परिसराची दर चार तासांनी स्वच्छता, दुर्लक्षित पाणपोई पुन्हा सुरू करणे, तसेच चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


या बद्दल दोन महिन्यांपूर्वीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घोषणा केली होती. यापूर्वी स्वच्छतागृहांच्या देखभालीची जबाबदारी खासगी कंत्राटदाराला दिली होती. तरी अस्वच्छतेच्या तक्रारी कायम होत्या. आता ही व्यवस्था बंद झाली आहे. स्वच्छतागृहांच्या देखभालीची आणि सर्व सुविधा देण्याची जबाबदारी पूर्णपणे एसटी महामंडळाकडे सोपवली गेली आहे. यामुळे सर्व आगारात एक समान सेवा पुरवल्या जाणार आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा

प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवासावेळी होणारा अतिरिक्त खर्च कमी होणार आहे. त्याशिवाय स्वच्छतागृहांमध्ये सुविधा आणि स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यावरही भर दिला जाणार आहे. दरम्यान, प्रवशांना स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रमुख बस डेपोंमध्ये मोफत पिण्याच्या पाण्याचे स्थानकं उभारण्याचीही महामंडळाची योजना आहे. यामुळे एसटी प्रवास अधिक सुखकर होणार आहे. प्रवाशांना कमीत-कमी खर्चात आरामदायी प्रवास आणि सोयी-सुविधांचा लाभ घेता येणार आहे.


राज्यात एसटी महामंडळाचा वर्धापनदिन १ जून रोजी साजरा केला जातो. १ जून १९४८ रोजी पुण्यातून पहिल्या लालपरीला सुरुवात झाली. यंदा एसटीला ७८ वर्ष पूर्ण होतील. त्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. याशिवाय एसटीचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात ८००० नव्या बससे येणार आहेत.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims