तेहरान: अमेरिकेनं इराण सोबतची शस्त्रसंधी गुंडाळत शांतता करार संपुष्टात आणताच होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला आहे. इराणनं एक भारतीय टँकर माघारी धाडला आहे. इराणी सैन्यानं भारतीय टँकरला होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडू दिली नाही.
याबद्दलची माहिती इराणची वृत्तसंस्था फार्सनं दिली आहे.
याआधी मंगळवारी (७ जुलै) होर्मुझमध्ये एका भारतीय टँकरवर हल्ला झाला आहे. हा टँकर भारताच्या दिशेनं येत होता. अमेरिकेनं इराणच्या बंदर अब्बासवर नुकतेच हल्ले केले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकेच्या सैन्य तळांना लक्ष्य केलं आहे. या सगळ्याची परिणीती होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव वाढण्यात झाली आहे.
इराणी वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीत ओमानच्या कॉरिडोरमधून जाणारा एक भारतीय तेल टँकर माघारी धाडण्यात आला आहे. हा टँकर होर्मुझ सामुद्रधुनीतील ओमानी कॉरिडरचा वापर करत होता. त्या कॉरिडॉरचा वापर करुन टँकर सामुद्रधुनी ओलांडण्याच्या प्रयत्नात होता. त्यावर इराणी सैन्यानं विरोध दर्शवला. त्यानंतर टँकरला माघारी जाण्यास सांगण्यात आलं.
२४ जूनला ओमान आणि संयुक्त राष्ट्राच्या मॅरिटाईम संघटनेनं ओमानच्या किनाऱ्याजवळून एका तात्पुरत्या कॉरिडॉरची घोषणा केली होती. आखातात अडकलेल्या जहाजांच्या सुटकेसाठी तयार करण्यात आलेल्या कॉरिडॉरची देखरेख अमेरिकेकडे आहे. फार्सनं वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडून (IRGC) रेडिओ कम्युनिकेशनच्या माध्यमातून ओमान कॉरिडॉरचा वापर करणाऱ्या जहाजांना इशारा दिला जात आहे. ओमान कॉरिडॉरच्या इराणनं निश्चित केलेल्या कॉरिडॉरचा वापर करावा, अशा सूचना आयआरजीसीकडून दिल्या जातात.
बुधवारी सकाळी होर्मुझ ओलांडणाऱ्या सगळ्या जहाजांनी इराणनं निश्चित केलेल्या कॉरिडॉरचाच वापर केल्याचं फार्सकडून सांगण्यात आलं. त्याआधी मंगळवारी कतारहून एलएनजी आणणाऱ्या जहाजावर हल्ला झाला. हे जहाज गुजरातच्या दिशेनं येत होतं. होर्मुझमधून प्रवास करत असताना जहाजावर ड्रोन हल्ला झाला. या जहाजावर एकूण २९ कर्मचारी होते. पैकी ४ भारतीय होते. हे सगळे कर्मचारी सुरक्षित आहेत. ड्रोन हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रुमला आग लागली होती.

