वेदांगी काण्णवआजच्या काळात लग्नसंस्थेकडे पाहण्याचा तरुण पिढीचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात बदलला आहे. करिअरमधील स्पर्धा, आर्थिक स्वावलंबन, लिव्ह-इन रिलेशनशिपचं वाढतं प्रमाण आणि वैवाहिक जबाबदाऱ्यांची भीती यामुळे आजच्या तरुण पिढीच्या मनात लग्नाविषयी वेगवेगळी मतं आहेत.
अशा बदलत्या परिस्थितीत तरुणांच्या मनात विवाहसंस्थेविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशानं अभिनेत्री सुलेखा तळवलकर तिच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून 'विवाह प्रसाद-शादी का लड्डू' हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
आयुष्याच्या उतारवयात हक्काचा जोडीदार असणं महत्त्वाचं असतं: सुलेखा तळवलकर
नव्या कार्यक्रमाविषयी सुलेखा तळवलकर सांगते, 'लग्न हे केवळ दोन व्यक्तींचं एकत्र येणं नसून, आयुष्य समृद्ध करणारी एक सुंदर संस्था आहे. हा विचार समाजात पुन्हा रुजवणं हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. आयुष्याच्या उतारवयात हक्काचा जोडीदार असणं किती महत्त्वाचं असतं, यावरही या कार्यक्रमातून भाष्य केलं जाणार आहे. त्यामुळे बदलत्या काळात विवाहसंस्थेची मूल्यं आणि तिचं महत्त्व पुन्हा अधोरेखित करण्यासाठी सुरू केलेली ही एक चळवळच म्हणावी लागेल. विवाहसंस्था ही एक सुंदर संकल्पना आहे, मात्र आज ती कुठेतरी हरवत चालली आहे. एकीकडे तरुण पिढी लिव्ह-इन रिलेशनशिपला पसंती देत आहे, तर दुसरीकडे घटस्फोटाचं प्रमाण वाढत आहे. मुलं नकोत, जबाबदारी नको अशी मानसिकताही दिसून येते. हे चित्र बदलायला हवं, असं मला वाटतं'.कार्यक्रमातून केवळ विवाहसंस्थेचं महत्त्व सांगण्यापेक्षा नात्यांच्या विविध पैलूंवरही सखोल चर्चा केली जाणार आहे. कलाकार जोडप्यांच्या वैवाहिक प्रवासासोबतच ५० वर्षांहून अधिक काळ एकमेकांची साथ निभावणाऱ्या जोडप्यांचे अनुभव जाणून घेतले जाणार आहेत. दीर्घकाळ टिकलेल्या नात्यांमागचं गमक, परस्परांमधील समजूतदारपणा आणि बदलत्या परिस्थितीत नातं जपण्याची कला यावरही प्रकाश टाकला जाणार आहे. वैवाहिक जीवनातील विविध अडचणींवर मार्ग काढण्यासाठी समुपदेशक, वकील, सेक्सॉलॉजिस्ट आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट यांचं मार्गदर्शनही या कार्यक्रमातून मिळणार आहे.
नात्यातील सुसंवाद, गैरसमज, नार्सिसिझम यांसारखे संवेदनशील विषय, तसंच दोन व्यक्तींमधील नातं अधिक निरोगी आणि सकारात्मक कसं करता येईल, यांसारख्या विषयांवरही चर्चा केली जाणार आहे. त्याचसोबत दोन व्यक्तींच्या भावनिक प्रवासाच्या दृष्टीनं पाहण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे.
"विवाहसंस्था कालबाह्य झालेली नाही, तर आधुनिक जीवनशैलीत तिचा मूळ गाभा कुठेतरी हरवला आहे. हा सामाजिक आणि भावनिक अनमोल ठेवा नव्या पिढीपर्यंत अधिक अर्थपूर्ण पद्धतीनं पोहोचवण्यासाठी आणि नात्यांमधील विश्वास पुन्हा जागवण्यासाठी सुरू केलेली ही चळवळ असून त्यात
माझा खारीचा वाटा आहे." - सुलेखा तळवलकर

