Dailyhunt
Sunjay Kapur : संजय कपूरचे बँक खाते सील; अभिनेत्री करिश्मा कपूरच्या मुला-मुलींना मोठा दिलासा

Sunjay Kapur : संजय कपूरचे बँक खाते सील; अभिनेत्री करिश्मा कपूरच्या मुला-मुलींना मोठा दिलासा

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरच्या निधनानंतर, ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्ता प्रकरणात एक मोठं वळण आलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं करिश्मा कपूरची दोन मुलं, समायरा कपूर आणि कियान राज कपूर यांना अंतरिम दिलासा दिला असून, त्यांची सावत्र आई प्रिया कपूरला संजय कपूरच्या मालमत्तेचा व्यवहार करण्यापासून थांबवलं आहे.

संजयच्या मालमत्तेची सुरक्षा महत्त्वाची

उद्योगपती संजय कपूरच्या ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणात, न्यायालयानं म्हटलं आहे की, मालमत्तेचं संरक्षण केलं पाहिजे. खटल्याला वेळ लागू शकतो. त्यामुळे, यादरम्यान याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व शंकांचं निरसन करावं, असंही न्यायालयानं सांगितलंय. या प्रकरणात प्रिया सचदेवला मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया कपूरला भारतीय कंपन्यांमधील इक्विटी किंवा शेअरहोल्डिंग गहाण ठेवण्यापासून, विकण्यापासून किंवा हस्तांतरित करण्यापासून थांबवलं आहे.


यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की, हे प्रकरण लांबेल आणि संजय कपूरची आई, राणी कपूर, यांचं वय आधीच ८० वर्षे आहे. त्यामुळे, न्यायालयानं त्यांना समेट करण्याचा सल्ला दिला. आता, या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होईल.



उद्योगपती संजय कपूरनं तीन वेळा लग्न केलं. त्याचं पहिलं लग्न १९९६ मध्ये नंदिता महतानीसोबत झालेलं. हे लग्न चार वर्षे टिकलं आणि २००० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर संजयनं २००३ मध्ये करिश्मा कपूरसोबत लग्न केलं. हे लग्न १३ वर्षे टिकलं आणि २०१६ मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. संजयनं २०१७ मध्ये प्रिया सचदेवसोबत लग्न केलं. दरम्यान, संजय कपूर यांचं १५ जून २०२५ रोजी लंडनमध्ये पोलो खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. संजय कपूरनं मृत्यूपत्रात आपली संपूर्ण मालमत्ता कथितरित्या त्याची तिसरी पत्नी प्रिया कपूरच्या नावे केली आहे. करिश्माची मुलं, समायरा आणि कियान यांनी हे मृत्युपत्र 'बनावट' असल्याचं सांगून त्यांनी आपल्या हक्कांची मागणी केली आहे. अलीकडेच, मुलांच्या याचिकेला प्रतिसाद देत, उच्च न्यायालयानं तिसऱ्या पक्षांना मालमत्ता हस्तांतरित करण्यास मनाई केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims