सूरत : गुजरातच्या सूरतमध्ये दोन एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. दोन्ही एसटी बस या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच महाराष्ट्राच्या एसटी बस होत्या. या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
संबंधित घटना ही पाच ते सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. सूरतच्या बारडोली तालुक्यातील उवा गांव येथे अपघाताची घटना घडली आहे. दोन्ही बस समोरासमोर आल्याने ही अपघाताची घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले. या अपघातात एका बसचा पुढचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला तर दुसरी बसही थेट पलटी झाली. पलटी झाल्यानंतर या बसला भीषण आग लागली. यामुळे अनेकांचा जीव गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघातग्रस्त बसपैकी एक बस ही धुळे-सूरत अशी होती. ही बस धुळेहून नंदूरबार नवापूर मार्गाने सूरत येत होती. तर दुसरी बस ही गुजरातहून महाराष्ट्राच्या दिशेला जात होती. चालकाचं नियंत्रण सुटल्याने एक बस ही डिव्हायडरला जावून धडकली. त्यानंतर समोरुन येणारी दुसरी बस ही बाजूला जात होती. पण बाजूला जात असताना ती पलटी झाली. पलटी होताच तिला आग लागल्याची माहिती आहे. अवघ्या क्षणार्धात इथे हाहा:कार उडाला.
घटना घडली त्या वेळेलाच तिथून पोलीस अधीक्षक जात होते. त्यामुळे त्यांनी तातडीने फोन करुन अतिरिक्त पोलीस फौजफाटा बोलावण्यात आला. घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल झाले आणि बचावकार्याला सुरुवात झाली. या अपघातात दहा ते बारा जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर मृतकांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु
सूरत हे शहर गुजरातमध्ये असलं तरी इथे मराठी नागरिकांची मोठी संख्या आहे. संबंधित परिसर हा खान्देशाला लागून आहे. यामुळे खान्देशातील लाखो नागरीक या भागात स्थलांतरीत झाले आहेत. ते वर्षानुवर्षे इथे राहत आहेत. अपघातग्रस्त बस नेमक्या कुठल्या आगारच्या आहेत ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण या घटनेमुळे महाराष्ट्रातही शोककळा पसरली आहे. या अपघातातील जखमी आणि मृतकांची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. तसेच बचाव पथकाकडून बचावकार्य सुरु असल्याची माहिती आहे.

