Dailyhunt
Surendra Patil : कल्याणमधील 23 वर्षीय तरुणाचा जीव घेतलेला, 12 वर्ष जुन्या केसची फाईल पुन्हा ओपन, रीलस्टार सुरेंद्र पाटीलला अटक

Surendra Patil : कल्याणमधील 23 वर्षीय तरुणाचा जीव घेतलेला, 12 वर्ष जुन्या केसची फाईल पुन्हा ओपन, रीलस्टार सुरेंद्र पाटीलला अटक

. टा. प्रतिनिधी, ठाणे : बारा वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या चौकशीत उघडकीस आली आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून या तरुणाची हत्या केल्यानंतर बॉडीची घनदाट जंगलात विल्हेवाट लावण्यात आली होती.

पोलिसांनी या हत्येच्या आरोपाखाली रीलस्टार सुरेंद्र पाटील याच्यासह अन्य दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने या तिघांनाही २ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

बारा वर्ष जुने अपहरण प्रकरण

कल्याण तालुक्यातील दावडी गावात राहणाऱ्या करण बागुल या २३ वर्षाच्या तरुणाचे २०१४ मध्ये अपहरण झाले होते. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र गुन्ह्याविषयी काहीच धागेदोरे न मिळाल्याने तपासात प्रगती झाली नाही.

सुरेंद्र पाटीलच्या अटकेनंतर धागेदोरे

यानंतर, काही दिवसांपूर्वीच शस्त्र साठ्याच्या प्रकरणात या युनिटने कुख्यात रीलस्टार सुरेंद्र पाटील (५५) याला अटक केली होती. तेव्हा २०१४ मधील करण बागुल याच्या अपहरणाशी त्याचा संबंध असल्याचे आढळले. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ३ चे (कल्याण) वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांनी या गुन्ह्याचा खोलात जाऊन तपास सुरू केला.


लोखंडी रॉडने हल्ला करुन खून

या पथकाने डोंबिवलीत राहणारा संशयित आरोपी चंद्रकांत गायकर (३९) याला अटक केली. नंतर सुरेश देगावत उर्फ छोटू (३२, ठाकुर्ली) यालाही जेरबंद केले. त्यांच्या चौकशीत खळबळजनक बाब समोर आली. सुरेंद्र पाटील याने जमीन विकसित करण्याच्या आर्थिक देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून ४ ऑक्टोबर, २०१४ रोजी करणचे अपहरण केले. नंतर त्याला दावडी गावातील धनलक्ष्मी अपार्टमेंटमधील कार्यालयात नेण्यात आले. तेथे सुरेंद्र याने लोखंडी रॉडने हल्ला करत करणची हत्या केली.

गाडीतून बॉडी नेत शवाची विल्हेवाट

त्याच दिवशी त्याने त्याच्याकडे बांधकामाच्या साइटवर काम करणारे आरोपी चंद्रकांत आणि सुरेश यांच्या मदतीने मुरबाड तालुक्यातील घनदाट जंगलात शवाची विल्हेवाट लावली. सुरेंद्र याच्या कारमधून ही बॉडी नेण्यात आली होती. सुरेंद्र याच्या विरुद्ध १४ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims