चेन्नई: माझ्या एका मतानं काय फरक पडतोय, मी मतदान केलं नाही तर काय होणार आहे, असा प्रश्न विचारणाऱ्यांना तामिळनाडूच्या तिरुपत्तूर विधानसभा मतदारसंघातील निकालानं उत्तर दिलं आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांच्या पक्षानं पहिल्याच फटक्यात १०८ जागा जिंकल्या.
या निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या उमेदवारांनी सत्ताधारी द्रमुकच्या दिग्गजांचा पराभव केला. यातील सर्वात उत्कंठावर्धक लढत तिरुपत्तर मतदारसंघात झाली.
द्रमुकचे उमेदवार आणि मंत्री के. आर. पेरियाकरुप्पन यांचा विधानसभा निवडणुकीत तिरुपत्तूर मतदारसंघात अवघ्या एका मतानं पराभव झाला. पेरियाकरुप्पन यांना ८३ हजार ३७४ मतं मिळाली. तर टीव्हीके पक्षाचे उमेदवार सीनिवसा सेतुपती यांना ८३ हजार ३७५ मतं मिळाली. अवघ्या एका मतानं पेरियाकरुप्पन यांचा पराभव झाला. पेरियाकरुप्पन द्रमुक सरकारमध्ये सहकार मंत्री होते. अवघ्या एका मतामुळे त्यांना पराभव पाहावा लागला.
विशेष म्हणजे निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक मतदार २४०० किलोमीटर अंतर कापून थेट मस्कतहून तामिळनाडूला आला होता. टीव्हीकेला मतदान करण्यासाठी त्यानं मस्कतहून तिरुपत्तूर गाठलं. शिवगंगा जिल्ह्यातील तिरुपत्तूरचे रहिवासी असलेले मणिकंदन शिवानंतम यांनी सोशल मीडियावर याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. 'मतदान करण्यासाठी मस्कतहून भारतात आल्याचा अभिमान वाटतो. या निवडणुकीचा निकाल ठरवणाऱ्या मतांमध्ये माझ्याही मताचा समावेश आहे,' असं मणिकंदन यांनी पोस्टमध्ये म्हटलं.
'तिरुपत्तूर मतदारसंघात केवळ एका मतानं टीव्हीके पक्षाचा उमेदवार निवडून आला. विजय थलपतीच्या पक्षाला मतदान करण्यासाठी मी मस्कटहून आलो आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. माझा प्रवास, माझं मत यामागची प्रेरणा थलपती विजयच आहे. या ऐतिहासिक क्षणाचा एक छोटा साक्षीदार ठरलो, याबद्दल आनंद आहे. तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल सगळ्यांचे आभार,' अशा भावना मणिकंदन यांनी एक्स पोस्टमध्ये नमूद केल्या.
तमिळनाडूत २३ एप्रिलला मतदान झालं. यासाठी मणिकंदन २२ एप्रिलला मस्कट एअरलाईन्सनं भारतात आले होते. त्यानंतर ते चेन्नई विमानतळावरुन घरी पोहोचले. २३ एप्रिलच्या सकाळी त्यांनी मतदान केलं. 'सर्वांनी मतदान करायला हवं. तुमचं मत वाया घालवू नका,' असा संदेश मणिकंदन यांनी दिला.
द्रमुकचे मंत्री के. आर. पेरियाकरुप्पन यांच्या पराभवात मणिकंदन यांच्या मतानं निर्णायक भूमिका बजावली. पेरियाकरुप्पन यांना पहिल्यांदाच पराभवाचा झटका बसला. त्यामुळे मणिकंदन यांच्या एका मतानं इतिहास रचला आहे. तिरुपत्तूर मतदारसंघातून पेरियाकरुप्पन सलग चारवेळा विजयी झाले आहेत. २००६ पासून ते सातत्यानं निवडून आले. पुढे मंत्रीदेखील झाले. पण यंदा टीव्हीकेच्या उमेदवारानं त्यांचा विजय रथ रोखला.

