'घुम है किसी के प्यार या स्टार प्लसवरील मालिकेत पाहायला मिळाली अभिनेत्री तन्वी ठक्कर हिचा तिचा नवरा आदित्य कपाडिया सोबत लग्नाच्या पाच वर्षांनंतर घटस्फोट होत आहे. नुकतेच या दोघांनी विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे.
तन्वीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही बातमी दिली. तिने एक सविस्तर पोस्ट शेअर करुन या निर्णयाला त्यांच्या आयुष्यातील सर्वात भावनिक निर्णयांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. आपल्या निवेदनात तिने नमूद केले की, तिने आणि आदित्यने एकमेकांचा आणि आपापल्या कुटुंबांचा आदर राखून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
तन्वीने लिहिले, "गेल्या काही महिन्यांत अनेक लोकांनी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि प्रश्न विचारले. खूप विचार केल्यानंतर, आदित्य आणि मी आता स्वतंत्र मार्गांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आमच्या दोघांसाठीही अत्यंत भावनिक आहे; आम्ही एकमेकांचा आणि आमच्या कुटुंबांचा आदर व विचार करून अत्यंत काळजीपूर्वक हा निर्णय घेतला आहे."
तन्वी ठक्करची घटस्फोटाची घोषणा
अभिनेत्रीने स्पष्ट केले की हा निर्णय परस्पर संमतीने घेण्यात आला आहे. शिवाय त्यांच्यात कोणताही कटुता नाही. ती म्हणाली, "यात कोणतीही नकारात्मकता किंवा अनावश्यक गोंधळ नाही; केवळ शांतता आणि संबंधित सर्वांसाठी चांगल्या भविष्याची विचार आहे. या काळात, मी प्रसारमाध्यमे, इंडस्ट्रीतील मित्र आणि हितचिंतकांना विनंती करते की त्यांनी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि आम्हाला आवश्यक ती मोकळीक द्यावी. या विषयाबाबतच्या कोणत्याही फोन कॉलला किंवा प्रश्नांना मी प्रतिसाद देणार नाही. तुमच्या समजूतदारपणाबद्दल, प्रेमळपणासाठी आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद."
तन्वी आणि आदित्य यांचे लग्न
हे जोडपे पहिल्यांदा 'एक दूसरे से करते हैं प्यार हम' या टीव्ही शोच्या सेटवर भेटले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर, त्यांनी 2013 मध्ये साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. साखरपुड्यानंतर सात वर्षांनी, 2021 मध्ये त्यांनी लग्न केले. तन्वी आणि आदित्य यांनी 16 फेब्रुवारी 2021 रोजी कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर घरीच एक छोटासा समारंभ आयोजित केला होता. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांना मुलगा झाला.
तन्वी आणि आदित्य यांचे शो
कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तन्वी 'बहू हमारी रजनी कांत' आणि 'गुम है किसीके प्यार में' सारख्या शोमध्ये दिसली आहे, तर आदित्यने 'जस्ट मोहब्बत', 'शाका लाका बूम बूम' आणि 'एक दूसरे से करते हैं प्यार हम' मध्ये काम केले आहे. त्याने 'कोड रेड' आणि 'बडे अच्छे लगते हैं' सारख्या प्रोजेक्ट्सवरही काम केले आहे. आदित्यने हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्येही काम केले आहे.

