Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Teejan Bai Passes Away: छत्तीसगडची लोककला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन

Teejan Bai Passes Away: छत्तीसगडची लोककला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन

रायपूर: छत्तीसगडची प्रसिद्ध लोककला 'पंडवानी' (महाभारतातील कथांचे गायन) आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या, दिग्गज लोकगायिका आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या डॉ. तीजन बाई यांचं दीर्घ आजारानं निधन झालं.

वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी रायपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशाच्या सांस्कृतिक आणि कला जगतावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीजन बाई गेल्या काही आठवड्यांपासून गंभीर आजारपणामुळं रायपूर 'एम्स'मध्ये उपचार घेत होत्या. आज पहाटे ३:१५ च्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील गनियारी गावात १९५६ मध्ये जन्मलेल्या तीजन बाई यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षाचा आणि जिद्दीचा होता. महाभारतातील पात्रांना आपल्या लोककलेतून जिवंत ठेवणाऱ्या तीजन बाई यांनी पारंपरिक रुढी-परंपरांना आव्हान दिलं. ज्या काळात पंडवानी गायनाच्या 'कापालिक शैली'वर केवळ पुरुषांचं वर्चस्व होतं आणि महिलांना केवळ बसून गाण्याची (वेदमती शैली) परवानगी होती, अशा काळात त्यांनी सर्व नियम बाजूला सारत उभे राहून, खणखणीत आवाजात पंडवानी सादर करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना समाजाकडून प्रचंड विरोध आणि बहिष्काराचा सामना करावा लागला, मात्र त्यांनी आपली कला सोडली नाही.

हातात तंबोरा घेऊन जेव्हा त्या मंचावर उतरत, तेव्हा कधी भीमची गदा, कधी अर्जुनचा रथ तर कधी द्रौपदीचे केस बनून त्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असत.

'लोकल ते ग्लोबल' पाच दशकांचा सुवर्णकाळ
गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर देशातच नव्हे, तर आशिया, युरोप, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंडसह जगभरात छत्तीसगडच्या मातीतली कला पोहोचवली. प्रसिद्ध रंगकर्मी हबीब तनवीर यांनी त्यांची कला ओळखली आणि त्यानंतर तीजन बाई यांचं नाव जागतिक स्तरावर गाजलं. तर दूरदर्शनवरील श्याम बेनेगल यांच्या 'भारत एक खोज' या प्रसिद्ध मालिकेतही त्यांनी महाभारताचे प्रसंग सादर केले होते.

सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरव
लोकसंस्कृती आणि कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय आणि ऐतिहासिक योगदानासाठी भारत सरकारनं त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं. यात पद्मश्री (१९८८) संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९५) पद्मभूषण (२००३) फुकुओका पुरस्कार (जपान) (२०१८) पद्मविभूषण (२०१९) या पुरस्कारांचा सामवेश आहे.

मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी वाहिली श्रद्धांजली
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी तीजन बाई यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. डॉ. तीजन बाई यांच्या जाण्यानं लोककलेची कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तीजन बाई यांच्या जाण्यानं भारतीय लोककलेचा एक सुवर्णकाळ संपला असला, तरी त्यांनी तयार केलेली कलाकारांची नवी पिढी आणि त्यांचा खणखणीत आवाज रसिकांच्या मनात सदैव जिवंत राहील.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims