Dailyhunt
Thane Double Decker Bus: ठाण्यात पहिल्यांदाच धावणार 'डबलडेकर एसी बस'! प्रवास होणार सुखकर; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शुभारंभ

Thane Double Decker Bus: ठाण्यात पहिल्यांदाच धावणार 'डबलडेकर एसी बस'! प्रवास होणार सुखकर; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शुभारंभ

. टा. प्रतिनिधी, ठाणे: परिवहन सेवेच्या ताफ्यात इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस गुरुवारी दाखल झाली. येत्या काळात अशाच प्रकारे दहा डबलडेकर बस दाखल होणार आहेत. त्यापैकी पहिली बस ठाण्यातील रस्त्यावर आल्याने या बसची छबी टिपण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

ठाण्यातील ही पहिली डबलडेकर बस असल्याने सर्वसामान्यांना उत्सुकता आहे. शुक्रवार, १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या बससेवेचा शुभारंभ केला जाणार आहे. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील ४०७ बसपैकी ३८१ बस प्रवासी सेवेसाठी उपलब्ध आहेत. टीएमटीच्या ताफ्यातील बसची संख्या वाढविण्याकडे प्रशासनाचा कल आहे. यामध्ये पीएम 'ई बस' योजनेतून १०० वातानुकूलीत इलेक्ट्रिक बस, १५ व्या वित्त आयोगातून १६० वातानुकूलीत इलेक्ट्रिक बस, १०० सीएनजी, १० डबलडेकर बसचा समावेश आहे.

आरटीओ नोंदणीनंतर रस्त्यावर

मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एसी डबलडेकर बस आहेत. टीएमटीच्या ताफ्यात अशा बस खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी घेतला. त्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर या बसगाड्या खरेदीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार ठाणे परिवहनच्या ताफ्यात एकूण १० इलेक्ट्रिक वातानुकूलित डबलडेकर बस दाखल होणार असून त्यापैकी या बसची नोंदणी प्रक्रिया प्रादेशिक परिवहन विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.

'या' मार्गावर सेवा

ठाण्यात घोडबंदर रोड मार्गावर ही बससेवा सुरू केली जाणार असून या भागातील मार्ग रुंद आहे. या भागातून डबलडेकर बस विनाअडथळा धावू शकते. तसेच वातानुकूलित बस ठाणे ते बोरिवली मार्गावरही चालविण्यात येत आहेत. या मार्गावर इतर सर्वच प्रकारच्या बसना प्रवाशांची मोठी मागणी असल्याने येथून परिवहन प्रशासनाला मोठे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रिक बसची संख्याही वाढणार

ठाण्यातील या 10 डबल डेकर बस यंदा दिवाळीपर्यंत दाखल होणार असल्याची माहिती आहे. मे च्या पहिल्या आठवड्यापासूनच पहिल्या डबल डेकर बससेवेला सुरूवात होणार आहे. परिवहन विभागाला टीएमटी बसेसच्या माध्यमातून दररोज 24 ते 25 लाखांचं उत्पन्न प्राप्त होतं. दरम्यान, या डबल डेकर बसचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आला होता. ठाण्यात यासह 123 एलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आल्या आहेत. यापुढे आणखी 100 एलिक्ट्रिक बस परिवहन सेवेच्या ताफ्यात येणार असून यापैकी पहिल्या 25 बस जून महिन्यापासून सुरू होतील.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims