विनित जांगळे, ठाणे : ठाणे वर्षा महापौर मॅरेथॉन स्पर्धा आणि वाद हे गेल्या अनेक वर्षांपासून असलेले समीकरण यंदाही कायम राहिले. २१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेतील धावपट्टूनी आयोजनाच्या ढिसाळ कारभारावरून नाराजी व्यक्त केली.
तसेच पदक आणि अल्पोपहार न मिळाल्याने हे धावपट्टू आणि शालेय विद्यार्थी स्पर्धक आणि त्यांच्या पालकांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. विद्यार्थ्यांनी मुख्य व्यासपीठासमोर ठिय्या देत निषेधाच्या घोषणा दिल्या. तर दुसरीकडे धावपट्टू थेट ठाणे पालिका मुख्यालयात दाखल झाल्याने त्यांना रोखण्यात सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. त्यामुळे पालिकेच्या प्रशासकीय आयोजनाची तोकडी धाव पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
लाखोंची बक्षिसे, भव्य दिव्य व्यासपीठ, नेतेमंडळी - कलाकारांची मांदियाळी असा थाटमाट असलेल्या ठाणे वर्षा महापौर मॅरेथॉन स्पर्धेच्या रविवारी सकाळी सहा वाजता सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र या स्पर्धेची विहित वेळेपेक्षा २० ते २५ मिनिटे उशिरा सुरवात झाल्याने अनेक स्पर्धकांचा हिरमोड झाला.
पदक आणि अल्पोपहारावरुन गोंधळ
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने स्पर्धकांना वातावरणाचा फटका बसलेला असताना नियोजनामधील त्रुटींचाही ताप झाल्याचे समोर आले. यंदा खड्डे अथवा स्पर्धेतील मार्गावरील कोंडी या मुद्द्यांवर स्पर्धकांना कोणताही फटका न बसल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र पदक वितरण यंत्रणेतील गोंधळ आणि अपुरा अल्पोपहाराच्या मुद्द्याने यंदा स्पर्धा गाजली.विद्यार्थी आणि पालाकांची व्यासपीठावर घोषणाबाजी
शालेय विद्यार्थ्यांना पदक न दिल्याने त्यांच्यासह पालकांनी मुख्य व्यासपीठासमोर घोषणाबाजी केली. अखेर महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेनेचे गटनेते पवन कदम, नगरसेवक विकास रेपाळे आणि राजेश मोरे यांनी स्पर्धकांची समजूत काढली. तसेच प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त मनिष जोशी यांनी या स्पर्धकांना तात्काळ अल्पोपहार उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.क्रीडा विभागाच्या उपायुक्त मीनल पालांडे यांनी स्पर्धा पूर्ण केलेल्या धावपट्टूना पालिकेच्या स्व. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पदकांचे वाटप पूर्ण केले. तसेच विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल प्रशस्तिपत्रक दिले जाते. पदक याआधीही देण्यात आलेले नाही. त्यामुळे गैरसमजुतीतून हा प्रकार घडल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
राजकीय 'खेळ' रंगला
या गोंधळानंतर याप्रश्नी राजकीय 'खेळ' रंगला. मॅरेथॉनमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या लहान मुलांनी आपलं कसब दाखवून स्पर्धा पूर्ण केली. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे या चिमुरड्यांना त्यांचे हक्काचे पदक देखील प्रशासनाला देता आले नाही. स्वतःच्या हक्कासाठी या लहान मुलांना भर रस्त्यात ठिय्या आंदोलन करावे लागले, ही बाब ठाण्याच्या संस्कृतीला आणि क्रीडा जगताला काळीमा फासणारी आहे. सत्ताधारी आणि महापालिका प्रशासन केवळ इव्हेंटबाजी आणि स्वतःच्या जाहिरातबाजीत मग्न असून, प्रत्यक्ष मैदानावर मात्र खेळाडूंची थट्टा उडवली जात आहे, असा आरोप शिवसेना (उबाठा) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला.आजची स्पर्धा 'झेन जी अल्फा'ने गाजवली, या स्पर्धेचे शहरात बॅनर खूप होते, मात्र पदक नव्हते, अशा शब्दात मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रशासनावर टीकास्त्र सोडले. तर या धर्तीवर ठाणे पालिकेच्या शाळेतील मुलांनी गणवेश नाही मिळाला, आणि ठाण्यात चांगले इंजिनिअरिंग, मेडीकल महाविद्यालय नाही म्हणून विद्यार्थ्यांनी जाब विचारला तर, काय परिस्थिती निर्माण होईल, लवकरच ठाण्यात विद्यार्थी एकत्र येऊन जनआंदोलन उभारतील, असा दावा मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी व्यक्त केला.

