Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Thane Municipal Corporation: ठाणे मनपा शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना गणवेशच नाहीत; जुन्या युनिफॉर्ममध्ये विद्यार्थी शाळेत

Thane Municipal Corporation: ठाणे मनपा शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना गणवेशच नाहीत; जुन्या युनिफॉर्ममध्ये विद्यार्थी शाळेत

.टा.वृत्तसेवा, ठाणे: शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल तीन महिने उलटले, तरी ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना अद्याप शालेय गणवेश मिळालेला नाही. दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य देण्याची घोषणा केली जाते.

जुना गणवेश , साध्या कपड्यांमध्ये विद्यार्थी शाळेत

मात्र, यंदा निविदा प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना गणवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी असून, विद्यार्थ्यांवर जुना गणवेश किंवा साध्या कपड्यांमध्ये शाळेत जाण्याची वेळ आली आहे.

खरेदीची प्रक्रिया उशीरा

ठाणे शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे २८ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना दरवर्षी महापालिकेकडून मोफत गणवेश दिला जातो. यंदा गणवेश खरेदीची निविदा प्रक्रिया उशिरा पूर्ण झाल्याने त्याचा थेट परिणाम वितरणावर झाला आहे.

१५ ऑगस्टला देखील जुन्या गणवेशात विद्यार्थी

काही विद्यार्थ्यांचे जुने गणवेश लहान झाले असून, तरीही त्याच गणवेशात शाळेत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विशेष म्हणजे, १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमातही अनेक विद्यार्थी जुन्याच गणवेशात दिसून आले. शाळेतील महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या दिवशीही विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळाला नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली.

पुढील आठवड्यात गणवेश वाटप

दरम्यान, गणवेश खरेदीची कार्यादेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील आठवड्यापासून विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप सुरू होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष वाटप कधी पूर्ण होते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

विलंबाचा फटका

दरवर्षी नियोजित वेळेत गणवेशाचे वितरण करण्यासाठी खरेदी प्रक्रिया शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करणे अपेक्षित असते. मात्र, यंदा झालेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. आगामी काळात अशा प्रकारचा विलंब टाळण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने प्रक्रिया राबवावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims