Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Thane News : ठाण्याच्या गोविंदा पथकांचा मुंबईत बोलबाला ; सरावातच सलग तिसऱ्यांदा रचले नऊ थर

Thane News : ठाण्याच्या गोविंदा पथकांचा मुंबईत बोलबाला ; सरावातच सलग तिसऱ्यांदा रचले नऊ थर

.टा.प्रतिनिधी,ठाणे: दहीहंडी उत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना ठाण्यातील तीन पथकांनी सराव शिबिरात नऊ थर रचण्याची कामगिरी केली. विशेष म्हणजे, वागळे इस्टेट येथील 'सीपी तलावचा राजा' गोविंदा पथकाने सलग तिसऱ्यांदा ही कामगिरी करताना लालबाग येथील सराव शिबिरात नऊ थरांचा मनोरा उभारला.

त्यामुळे ठाण्यातील पथकांचा डंका वाजत असल्याचे दिसून आले.

गोविंदा पथकाने रचले नऊ थर

गोकुळाष्टमीच्या दिवशी उंच थरांची दहीहंडी फोडण्याच्या पूर्वतयारीची रंगीत तालीम म्हणून सराव शिबिर, अर्थात चोर दहीहंडी उभारण्याची परंपरा आहे. गेल्या आठवड्यात 'सीपी तलावचा राजा' गोविंदा पथकाने कोपरीच्या अष्टविनायक चौकात दहीहंडी शिबिरात नऊ थर रचले होते.

'रामनगरचा राजा' पथकाची देखील नऊ थरांची कामगिरी

तीच कामगिरी त्यांनी मुंबईत कायम ठेवत उमरखाडी येथे झालेल्या सराव शिबिरात दुसऱ्यांदा, तर लालबाग येथे तिसऱ्यांदा नऊ थर रचले. त्यांचे कौतुक करण्यासाठी मनसे ठाणे जिल्हा दहीहंडी उत्सवाचे आयोजक व पक्षाचे नेते अविनाश जाधव यांनी भेट घेतली. दरम्यान, वागळेतील 'रामनगरचा राजा' या पथकानेही सराव शिबिरात नऊ थर उभारण्याची कामगिरी केली.

अपघातशून्य थर रचण्याचा सल्ला

'ठाण्याचा राजा' गोविंदा पथकाने यंदा सातत्यपूर्ण सराव केला असून, ज्या ठिकाणी पथकाचा सराव होतो, तेथे नऊ थरांचा मनोरा दोन ते तीन वेळा रचला आहे. सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव, खोपट विभाग, घोडबंदरचे मस्ती ग्रुप, धर्मवीरनगरचा राजा या विविध पथकांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे. यंदाही मंडळांची योग्य तयारी झाली असून, अपघातशून्य थर रचण्याचा मानस सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव, खोपट विभाग मंडळाचे सल्लागार समीर पेंढारे यांनी व्यक्त केला.

पाच एक्के उभारण्याची किमया केली

कळवा येथील खारेगाव-पाखाडी भागात ओम साई गोविंदा पथकाने ठाण्यात प्रथमच सरावादरम्यान पाच एक्के उभारण्याची किमया केली. मुंबईतील माझगाव-ताडवाडी गोविंदा पथक अशी कामगिरी करण्यासाठी यंदा प्रयत्नशील असून, त्यापाठोपाठ ठाण्यातील गोविंदा पथकही तयारी करत आहेत.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims