-राहुल गोखलेहाँगकाँगमधील लोकशाहीवादी माध्यमसम्राट जिमी लाय यांना काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत वीस वर्षांची कठोर शिक्षा सुनावण्यात आली. वयाच्या ७८व्या वर्षी मिळालेली ही शिक्षा म्हणजे एक प्रकारे जन्मठेपच.
एकेकाळी मुक्त अर्थव्यवस्था आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे केंद्र असलेला हाँगकाँग चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पोलादी विळख्यात गुदमरत असताना, लाय यांनी हुकूमशाहीला दिलेल्या एकाकी आव्हानाचे प्रभावी चित्रण मार्क एल. क्लिफोर्ड यांनी 'द ट्रबलमेकर' या पुस्तकात केले आहे. लेखकाच्या लाय यांच्याशी असलेल्या दीर्घकालीन संपर्कामुळे हे कथन प्रत्ययकारी झाले आहे.
सुरुवातीला लेखकाने लाय यांचा हाँगकाँगपर्यंतचा थरारक प्रवास रेखाटला आहे. चीन 'द ग्रेट लीप फॉरवर्ड'च्या नावाखाली भीषण दुष्काळाशी झुंजत असताना जिमी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी एका नौकेतून चोरून हाँगकाँगला आले. तत्पूर्वी ग्वांगझू रेल्वे स्टेशनवर हमाली करणाऱ्या पोरसवदा लाय यांना एका प्रवाशाने दिलेल्या चॉकलेटच्या तुकड्याने बाह्य जगाच्या वेगळेपणाची पहिली जाणीव करून दिली होती. कापड कारखान्यात मजुरी करताना अपघातात त्यांच्या बोटाचा शेंडा कापला गेला; तर यंत्रांच्या प्रचंड आवाजामुळे एका कानाची श्रवणशक्तीही गेली. लेखक लाय यांच्या संघर्षाचा हा पट विस्ताराने मांडतोच; पण त्यांची अफाट जिद्द, कठोर मेहनत, कल्पकता आणि धोके पत्करण्याची वृत्ती यांमुळे एका मजुराची उद्योगपती होण्यापर्यंतची यशस्वी वाटचाल कशी झाली याचेही अचूक बारकावे टिपतो.
'कॉमिटेक्स' या स्वेटर कंपनीतून त्यांनी उद्योजकतेचा केलेला श्रीगणेशा, अमेरिकेतील रिटेल कंपन्यांकडून असलेली मोठी मागणी, १९८१मध्ये त्यांनी स्थापन केलेला 'जिओर्डानो' हा आंतरराष्ट्रीय ब्रँड, त्याची चीनमध्येही सुरू केलेली विक्रीकेंद्रे या त्यांच्या यशाच्या कहाण्या आहेत. त्याचबरोबरच 'ॲडमार्ट' या ऑनलाइन स्टोअरमध्ये त्यांना लाखो डॉलरचा बसलेला आर्थिक फटका किंवा सन २०००मध्ये तैवानमध्ये पाय रोवताना तेथील चीन समर्थक व्यावसायिक वर्गाने त्यांच्या आक्रमक पत्रकारितेला केलेला विरोध हे टप्पेही लेखकाने चोख टिपले आहेत. डेंग शियाओपिंग यांच्या आर्थिक सुधारणांनी प्रभावित झालेले लाय यांचा होरा, आर्थिक प्रगतीमुळे चीनमध्ये राजकीय पारदर्शकता येईल, असा होता; मात्र १९८९च्या तियानमेन चौकातील भीषण नरसंहाराने त्यांचा भ्रमनिरास झाला आणि १९९७मध्ये हाँगकाँग ब्रिटनकडून चीनच्या ताब्यात जाताच आता पुढे काय वाढून ठेवले आहे, या विचाराने त्यांना धडकी भरली. याच टप्प्यावर त्यांच्यातील उद्योगपती मागे पडला आणि एक लोकशाही समर्थक लढवय्या जागा झाला या स्थित्यंतराचा वेध लेखक प्रभावीपणे घेतो.
फ्रेडरिक हायेक व कार्ल पॉपर यांच्या विचारांचा लाय यांच्यावर असणारा प्रभाव, २०१९च्या प्रत्यार्पण विधेयकविरोधी आंदोलनात किंवा 'अम्ब्रेला मूव्हमेंट'मध्ये केवळ आर्थिक रसद पुरवून न थांबता त्यांनी आंदोलनात घेतलेला सक्रिय सहभाग, जाचक 'राष्ट्रीय सुरक्षा कायद्या'नंतर हाँगकाँग चीनच्या ताब्यात गेल्यानंतर लाय यांनी लोकशाहीसाठी निर्भयपणे दिलेला लढा, त्याची त्यांच्या अटकेत झालेली परिणती हा सगळा पट लेखक उलगडून दाखवितो. १९९० मधील 'नेक्स्ट मॅगझिन' आणि १९९५ मध्ये सुरू झालेले 'ॲपल डेली' वृत्तपत्र सुरुवातीला त्यांच्या सनसनाटी वार्तांकनासाठी ओळखले जात होते; मात्र पुढे लोकशाहीच्या लढ्यात याच माध्यमांनी जनमानसात आदराचे स्थान कसे मिळवले हा प्रवास मुळातूनच वाचण्यासारखा आहे.
लाय यांचे चारित्र्य इतके निष्कलंक, की पैशाचे आमिष वा कोणतेही लैंगिक 'ब्लॅकमेलिंग' त्यांना झुकवू शकले नाही. संपत्तीची हाव नसल्यामुळे त्यांना कोणीही विकत घेऊ शकले नाही. माध्यम प्रमुख म्हणून लोकशाहीच्या लढ्यात त्यांची हीच निःस्पृहता मोलाची ठरली, याकडे लेखक लक्ष वेधतो. अनेक अब्जाधीशांनी चिनी दडपशाहीपुढे गुडघे टेकले असताना आणि अनेक लोकशाहीवाद्यांनी परागंदा होणे पसंत केले असताना पळणे म्हणजे भ्याडपणा या धारणेमुळे ब्रिटनचे नागरिकत्व असूनही लाय यांनी देश सोडण्यास ठाम नकार दिला. एकाकीपणे लढण्याचे धैर्य त्यांनी दाखवले आणि त्याची मोठी किंमतही मोजली. 'लोकशाहीसाठी किंमत मोजावीच लागते' हा मोलाचा संदेश देणारे हे पुस्तक म्हणजे एकाधिकारशाहीच्या छायेत लोकशाहीची मशाल तेवत ठेवण्यासाठी एका अब्जाधीशाने दाखवलेल्या निर्भीडतेचा थरारक दस्तऐवज आहे.
--------------------------------
दि ट्रबलमेकर
लेखक : मार्क क्लिफोर्ड, प्रकाशक : फ्री प्रेस
पाने : २८८, किंमत : १२८१ रुपये

